यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी

0
3

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष उत्तमराव पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार असलेले मनिष पाटील यांना १५, तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजुदास जाधव यांना केवळ सहा मते मिळाली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा बँकेतील समीकरणही बदलले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. २१ सदस्यीय जिल्हा बँकेत काँग्रेसकडे सर्वाधिक नऊ संचालक आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीन आणि शिंदे गट, शरद पवार गट व अजित पवार गटासह अपक्ष असे प्रत्येकी दोन संचालक आहेत. भाजपाकडे अवघा एक संचालक असतानाही स्थानिक भाजपा नेत्यांनी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपा-शिंदे गट व अजित पवार गट या महायुतीचा उमेदवार बसविण्याचा चंग बांधला होता. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, भाजपा आमदार मदन येरावार आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी प्रचंड कष्ट घेतले.