देशाच्या एकतेकरीता जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गौण-खा.सुनिल मेंंढे

0
7

ओबीसी जागर यात्रा आजपासून जिल्ह्यात
– खासदार सुनील मेंढे यांची पत्रकार परिषदेत माहिती

गोंदिया : केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी अमलात आणलेल्या आणि राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने, तसेच काही राजकीय पक्षांकडून ओबीसींच्या बाबतीत पसरविल्या जात असलेल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ओबीसी जागर यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. २ आॅक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सुरू झालेली जागर यात्रा ५ आॅक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्यात दाखल होत आहे. ६ आॅक्टोबर रोजी ओबीसी जागर सभेचे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले आहे. अशी माहिती आज ४ आॅक्टोबर रोजी शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा.सुनिल मेंढे यांनी दिली. तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर सध्या राजकारण केले जात असून देशाच्या एकतेकरीता जातनिहाय जनगणना हा मुद्दा काही महत्वाचा नसून तो गौण आहे.जातनिहाय जनगणनेने मतभेद वाढून अराजकता निर्माण होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.2011 मध्येच तत्कालीन केंद्र व विरोधी पक्षाच्या समंतीने जनगणनेत आलेले आकडे प्रसिधद् न करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याचेही मेंढे म्हणाले.
यावेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष पकंज रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार रमेश कुथे, जि.प. सभापती संजय टेंभरे, जिल्हा महामंत्री सुनिल केलनका,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, भावना कदम, शहर अध्यक्ष अमित झा, रिता बागडे, संजय मुरकुटे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेंढे म्हणाले की, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांना घेऊन ओबीसी बांधवांमध्ये विरोधकांच्या वतीने गैरसमज पसरण्याचा प्रकार केला जात आहे. ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी सर्वाधिक प्रयत्न आणि योजना प्रत्यक्षात आणण्याचे काम भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार करीत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार तेवढेच गंभीर आहे. दरम्यान ओबीसींच्या कल्याणाच्या दृष्टीने राबविलेल्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने घेतलेले ओबीसींसाठीचे कल्याणकारी निर्णय, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी स्थापन केलेले स्वतंत्र मंत्रालय, अर्थसंकल्पात केलेली स्वतंत्र तरतूद क्रिमिलियरची चार ऐवजी आठ लाखावर नेण्यासाठी घेतलेला निर्णय, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था स्थापन करून उभारण्यात आलेली व्यवस्था तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा निहाय वस्तीगृह उभारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत सकारात्मक म्हणावं लागेल.
सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण विषयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देवू असे ठामपणे सरकारने स्पष्ट केले आहे. भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षित घटकांना भरघोस निधी देण्यासाठी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत. राज्य शासन केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेशी सांगड घालीत ओबीसी समाजासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या योजना राबवून १२ बलुतेदारांना लाभ देण्याचे पाऊल उचलत आहे. सोबतच ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमीलेअर च्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्याच्या दृष्टीने शासन विचाराधीन आहे.
राज्य आणि केंद्र सरकार ओबीसी हितासाठी सर्वतोपरी काम करीत आहे. हे काम जनतेपर्यंत पोहचावे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली आहे. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी न्हावी समाजाचे श्रद्धास्थान हिंगणघाट तालुक्यातील पारडी (नगाजी) येथून सुरुवात झाली. ही यात्रा. संपूर्ण विदर्भ पादाक्रांत करेल. या यात्रेत ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रभारी आशिष देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र चव्हाण पुर्णवेळ आहेत. यात्रेचे समारोप १२ आॅक्टोबर रोजी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे होणार आहे.
यात्रेचे आगमन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात दिनांक ५ रोजी होणार आहे. ५ ते ७ आॅक्टोबर ही यात्रा संपूर्ण लोकसभा मतदार संघात भ्रमण करेल. ५ आॅक्टोबर ला सायंकाळी अर्जुनी/मोरगाव येथे यात्रेचे आगमन होईल. नंतर अर्जुनी/सडक आणि रात्री गोंदिया येथे मुक्कामी असून ६ आॅक्टोबर ला गोंदिया येथे सकाळी १० वाजता ओबीसी जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नंतर तिरोडा मार्ग तुमसर येथे सायंकाळी ५ वाजता ओबीसी जागर सभा आयोजित करण्यात आली आहे. भंडारा येथे यात्रेचा मुक्काम राहणार आहे. भंडारा येथे ७ आॅक्टोबर ला महाजनसंपर्क अभियान करुन यात्रा नागपूर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.
दोन्ही जिल्ह्यात ही यात्रा फिरून ओबीसींचा जागर करणार आहे. या यात्रेत सर्व ओबीसी समाजबांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खा.मेंढे यांनी केले.