ठरलं! राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार ?

0
4

सत्ताधारी 5, काँग्रेसला 1 जागा निश्चित

मुंबई – राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची, याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झालंय. सत्ताधारी पक्षांच्या वतीने भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना 5, तर विरोधकांना 1 जागा मिळणार आहे. ही जागा काँग्रेसला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात झालेल्या एकमतानुसार भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. भाजपच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येईल. त्यामुळे या 6 जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कुणाची नियुक्ती केली जाईल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचे नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे भाजपच्या गोटातून समजतंय. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी याचं बक्षीस त्यांना मिळेल असा बांधला जातोय. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची भाजप रणनिती आखत आहे. एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगलीय. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.