मुलखा वेगळा पोलिस अधिकारी….डॉ माधवराव सानप

0
3

सानप परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अतिशय दुर्गम खेडेगावातील.त्यांना अगदी लहान वयात वारकरी संप्रदाय आणि समाजसेवेचे व्रत घरातूनच मिळाले.सन २००१ च्या दरम्यान सानपसाहेब पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले.
पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना समाजातील घटकांसोबत काम करावे लागते.यात गुन्हेगार नसते तर नवलच या क्षेत्रात काम करत असताना त्यांना गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचा विचार मनात घोंगावत असायचा.
कोणत्याही गुन्हेगाराला आपल्या मुलांनी गुन्हेगारी क्षेत्र निवडावे असे वाटत नाही याच संकल्पनेचा आधार घेऊन सानप साहेबांनी या गुन्हेगारांच्या लहान आणि निष्पाप अशा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काही तरी केले पाहिजे व त्यांना शिक्षणाचा आधार देऊन समाजातील मुख्य प्रवाहात आणायला हवे अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
याच विषयासंदर्भात आमची एकदा भेट झाली आणि या विषयावर चर्चा सुरू झाली त्यांनी ध्यास फाउंडेशन स्थापन करून या मुलांसाठी आळंदी येथे शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.सर्वच सहकाऱ्यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला त्यावेळी प्रा. रामकृष्ण मोरे सर हे शिक्षणमंत्री होते त्यांनीही या संकल्पनेला दुजोरा दिला त्यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करून मान्यता घेऊन मी शाळा पाहण्यासाठी शाळेची मान्यता घेऊन येईल असा निरोप सानपसाहेबांना पाठवला.सानपसाहेबांनी आळंदी येते चार खोल्या भाड्याने घेऊन शाळाचे प्राथमिक कामकाज सुरू केले.
शाळा सुरू करताना शिक्षकांच्या पगारासाठी आणि इतर खर्चासाठी आपल्या आईचे दागिने मोडून पाच लाख रुपये उभे केले.ही गोष्ट त्यांनी कधीही, कुठेही सांगितली नाही.शाळेची मान्यता घेऊन प्रा. मोरे सर आणि मी आळंदीला गेलो आणि गुन्हेगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू झाली व सानप साहेबांचे स्वप्न साकार झाले.आता या शाळेचा विस्तार मोठा झालेला आहे अंगणवाडी पासून ते इयत्ता बारावी पर्यंत येथे शिक्षण प्रदान करण्याचे काम सुरू आहे.
चार खोल्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता वटवृक्षासारखा पसरला आहे अद्यावत इमारत, संगणकासह सर्व सुविधा, प्रशिक्षित अध्यापक वर्ग हे पाहताना आनंद वाटतो.ज्या काळात व्यावसायिक शिक्षणाला भर आला होता त्या काळात सानप साहेबांसारख्या एका अधिकाऱ्याने आपल्या आईचे दागिने मोडून गुन्हेगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली म्हणूनच ते मुलखा वेगळे पोलीस अधिकारी आहेत.या तीन फेब्रुवारी रोजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सानप साहेबांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून आग्रहाने निमंत्रित केले होते या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व ज्ञानार्जन करणाऱ्या अध्यापकांकडून स्वागत स्वीकारताना माझे मन कृतज्ञ झाले.
सानप साहेबांच्या कार्याला त्रिवार सलाम..
हरी चिकणे, पुणे