मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात आल्यानंतर आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी त्यांचे स्वागत केले. चव्हाण यांनी भाजप मुख्यालयात पाऊल ठेवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात बोलतांना अशोक चव्हाण अडखळले. तर, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले. पण, आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाणांनी सावरासावरी केली.
नेमका काय घडलं?
मुंबईच्या भाजप कार्यालयात आज अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी सुरवातीला अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल टाकून आणि बुके देऊन चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष प्रवेशाची माहिती दिली. पुढे अशोक चव्हाण यांनी बोलायला सुरवात केली. मात्र, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यावेळी “देवेंद्र फडणवीस” यांनी चूक दुरुस्त करत “मुंबई” मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. तर, अशोक चव्हाण यांनी देखील पहिलाच दिवस असल्याचे म्हणत सावरासावरी केली.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
आम्ही विरोधात आणि सत्तेत असतांना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करतांना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवीन सुरूवात करतोय. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
हा माझा व्यक्तिगत निर्णय…
सभागृहात मी विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे मांडली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते. ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कुणी जा असे सांगितले नाही, असा खुलासा देखील चव्हाण यांनी केला.