मंत्री धर्मराव आत्राम म्हणतात, ‘शरद पवार थकले त्यांनी…’

0
9

नागपूर : शरद पवार गटाकडे कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांची संख्या कमी झाली आहे आणि आता ते थकले आहेत. त्यामुळे त्यांनी आपला गट अजित पवार गटात विलीन करावा आणि महायुतीची ताकद वाढवावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांनी व्यक्त केले.धर्मराव आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार असून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि बहुतांश पदाधिकारी व कायकर्ते आमच्याकडे आहे. त्यामुळे शरद पवार गटाने वेगळा गट स्थापन करण्यापेक्षा अजित पवार गटात विलिन करावा असेही आत्राम म्हणाले.अपात्रतेच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा निर्णय आमच्याच बाजूने लागेल, चिन्ह आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल. अजित पवार अधिकृत पक्षाचे नेेते असल्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र केले पाहिजे असेही आत्राम म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही भंडारा, गडचिरोली आणि वर्धा या तीन जागांची मागणी केली आहे मात्र जागेच्या बाबतीत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेतील. प्रफुल पटेल यांना सहा वर्ष पुन्हा खासदार राहता यावे म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.