मुंबई(वृत्तसंस्था)- मुंबईच्या टिळक भवनात सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी आमदार सेवक वाघाये यांना आपण निमंत्रित नाही, असे म्हणत बाहेरचा रस्ता दाखविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काँग्रेसचे आमदार राहिले आणि अनेक वर्ष काँग्रेसची सेवाही केली, तरी माजी आमदार सेवक वाघाये यांची अवस्था दयनीय झाली आहे.मुंबईच्या टिळक भवनात मुंबई वगळता 22 पैकी 19 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज (ता. 5) एक बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा फ्रंटल सेल, आमदार-खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान भंडारा-गोंदिया लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 12 वाजता बैठक सुरू झाली. अचानक या बैठकीला माजी आमदार सेवक वाघाये यांची एन्ट्री झाली. त्यांना बघताच नाना पटोले यांचा पारा सरकला आणि त्यांनी चक्क ज्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांनीच या बैठकीला उपस्थित राहावे, असे फर्मान सोडले. साहजिकच सेवक वाघाये यांना निमंत्रण नसल्याने नानांनी त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे पटोले व वाघाये यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे सांगण्यात आले आहे.