आमदार राजू पारवेंचा काँग्रेसचा राजीनामा,शिंदे शिवसेनेत प्रवेश

0
9

नागपूर: काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना रामटेकची लोकसभेची उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न फसला असला तरी पारवे यांना भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना रामटेकची निवडणूक लढवायला सांगण्यात आले आहे. आता पारवे हे सेनेचे रामटेकमधून उमेदवार असणार आहे. उमेदवार भाजपचा आणि लढणार सेनेच्या धनुष्यबाणावर असे चित्र निर्माण झाले आहे.

रामटेक लोकसभा मतदार संघातून सलग दोन वेळा शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आले आहेत. शिवसेना पक्षात फुट पडल्यावर कृपाल तुमाने एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. लोकसभा निवडणूकीसाठी तुमाने रामटेकची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होते. पण सेनेत फूट पडल्यावर या पक्षाची ताकद कमी झाल्याचे कारण देऊन भाजपने या जागेवर दावा केला होता. यासाठी भाजपने उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन रामटेकमधून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे कृपाल तुमाने यांच्या समर्थनाथ नागपूर- रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते.