गोंदिया : एकीकडे भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील नागरिक पुर परिस्थितीशी लढत असताना दुसरीकडे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी वाहनाच्या बोनटवर स्टंटबाजी करून व्हिडिओ रील बनविताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या या कृत्याचा निषेध नोंदविला आहे.
गेली दोन दिवस दिनांक ९ आणि १० सप्टेंबर रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान घेतला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकजण बेघर झाले. काहींचा बळीही या पावसाने घेतला, असे असताना भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करतेवेळी चक्क आपल्या वाहनाच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी केली. खासदाराचा बोनेटवर बसून रील बनविण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात ते वाहनाच्या बोनटवर बसले असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून त्यांचे वाहन भरधाव वेगाने जाताना दिसत आहे.
तर खासदार हसत-हसत कॅमेर्याकडे हात दाखविताना दिसत आहेत. एकीकडे पुर परिस्थितीने नागरिक त्रस्त झालेले असताना खासदाराचा हा रील समोर आल्याने आता खासदारांप्रती रोष व्यक्त होत आहे. तर मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.