बेळगाव- कर्नाटक विधानसभेत मोबाईलवर वापरावर आजपासून (शुक्रवार) बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकातील औराद भागातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रभू चव्हाण बुधवारी (ता. 10) स्मार्टफोनवर प्रियांका गांधी-वद्रा यांच्यासह अन्य काही आक्षेपार्ह फोटो पाहताना आढळून आले होते.
विधानसभेत चव्हाण यांच्यासह गृहनिर्माण मंत्री एम. एच. अंबरीश व कॉंग्रेस नेते एस. एस. मल्लिकार्जुन हे मोबाईल हाताळता आढळून आले होते. विविध चॅनेलवर व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर चव्हाण मोबाईलमध्ये प्रियांका गांधी-वद्रा यांच्यासह अन्य काही छायाचित्रे पाहताना दाखवत होते. या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष कागोडू थिमप्पा यांनी यांनी चव्हाण यांना निलंबित केले आहे.
थिमप्पा म्हणाले, ‘प्रभू चव्हाण हे मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्रे पाहताना आढळून आले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेमध्ये मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे.‘
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत 2012मध्ये भाजपचे दोन मंत्री मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहताना सापडले होते.