अनुसूचित जाती आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेच्या अध्यक्षपदी माधव भांडारी

0
40

मुंबई-केंद्रीय अनुसूचित जाती आश्रमशाळा चालविणाऱ्या राज्यातील संघटना चालकांनी एक राज्यव्यापी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची एकमताने निवड करण्यात आली.
आश्रमशाळा चालविणाऱ्या दीडशे संस्थाचालकांची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत वरील निर्णय झाला. या पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व संघटना विलीन करून एकच राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आली.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दलित समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनुसूचित जाती केंद्रीय आश्रमशाळा योजना सुरू करण्यात आली. तथापि, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे या आश्रमशाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या संकटात सापडल्या आहेत. सध्या संस्थाचालक स्वतःच्या खर्चाने या शाळा चालवत आहेत. मा. माधव भांडारी गेली दीड वर्षे या संस्था चालकांच समस्या सोडवून अनुसूचित जाती आश्रमशाळांना चालना देण्याच्या प्रयत्नात होते.
मेळाव्यात संस्थाचालकांनी सांगितले की, अनुसूचित जाती आश्रमशाळा योजना वाजपेयी कार्यकाळात सुरू केलेली दलितांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्यांचे सरकार गेल्यानंतर आघाडी सरकारने हेतुपुरस्सर अनुदानापासून वंचित ठेवले. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये न्याय मिळाला नाही. शाळांचे सर्व विद्यार्थी दलित समाजातील आहेत. दलित समाज शिकू नये असे आघाडी सरकारचे धोरण होते.
महाराष्ट्र राज्य केंद्रीय अनुसूचित जाती आश्रमशाळा कृती समिती अध्यक्ष रमेश भानवे, रमेश सुलताने, सोहन धार्मिक, सुशांत भूमकर, प्रसाद कुलकर्णी, अंबादास ढोके, नारायण बोरकर उपस्थित होते.