
चंद्रपूर : भाजप, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष असा राजकीय प्रवास असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष प्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व शेवटी आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार भाजपात स्थिरावले. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला कालपर्यंत तीव्र विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवगीर्य आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जोरगेवार यांचा भाजप प्रवेश येथील हॉटेल ए. डी. मध्ये पार पडला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नम्रता आचार्य यांनी प्रवेश घेतला. या दोघांच्या भाजप प्रवेशाने भाजपची शक्ती या जिल्ह्यात वाढली आहे असे या प्रवेशाच्या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत भाजपला व महायुतीला यश मिळेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहे.