महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही महायुतीमधील खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र यानंतर आता एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवं आहे. परंतु, शिंदेंना गृहमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनादेखील भाजप धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला होते. तसेच त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीत आहेत. परंतु, एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे खातेवाटपाचा पेच अद्याप कायम असल्याचं दिसत आहे. याशिवाय भाजप नेतृत्त्वाशी चर्चा करुन कॅबिनेटचा विस्तार करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. पण महत्त्वाच्या खात्यांचा तिढा हा कायम आहे.
याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ मंत्रालय मिळत असेल तर मला गृह मंत्रालय मिळावं अशी स्पष्ट मागणी एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली आहे. तसेच अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा अनुभव हा दांडगा आहे.मात्र भाजप पक्षाकडे असलेलं संख्याबळ आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी असलेला त्यांचा आग्रह पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ मंत्रालय सोडावं देखील लागू शकतं. त्यामुळे अर्थखातं हे भाजपला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांना भाजप धक्का देऊ शकत असं बोललं जात आहे.