भंडारा,दि.१५ः आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्यात बड्या आमदारांना फोन गेले आहेत. त्यामुळे आता ज्यांना फोन गेले आहे, त्यांचे मंत्रिपद तर निश्चित झाले आहे. परंतु या विस्तारावरुन नाराजीनाट्य देखील समोर आलं आहे. कारण शिवसेना नेते व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
तसेच शिवसेनेचे नेते आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आता शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा देखील दिला आहे.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात त्यांना कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजनामा दिला आहे. मात्र यामुळे आता नरेंद्र भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.