भंडारा व गोंदिया जिल्ह्याची मंत्रिमंडळात पुन्हा उपेक्षा;स्थानिक पालकमंत्र्यास खा.पटेलांची आडकाठी?

0
661

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.१५:भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.आज गोंदिया जिल्हा निर्मितीला २५ वर्ष लोटली,मात्र या २५ वर्षात २०१४ मध्ये पहिल्यांदा स्थानिक पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या रुपात जिल्ह्याला मिळाला.तो सुध्दा साडे चार वर्षाकरीताच.हा काळ सोडला तर गोंदिया जिल्ह्याला पार्सल पालकमंत्री ते सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातूनच मिळालेले आहेत.तीच परिस्थिती भंडारा जिल्ह्याची राहीली असून बंडु सावरबांधे व नाना पचंबुध्दे हे राज्यमंत्री वगळता या जिल्ह्यालाही पार्सल पालकमंत्र्याचाच मारा सहन करावा लागला आहे.परंतु यावेळच्या निवडणुकीत महायुतीचा दोन्ही जिल्ह्यात चांगले यश मिळाल्याने राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातीलच आमदाराला स्थान मिळेल अशी आशा जनताच नव्हे तर महायुतीचे नेते व कार्यकर्ते सुध्दा लावून होते.मात्र पुन्हा एकदा भंडारा व गोंदिया जिल्ह्याची पुन्हा एकदा उपेक्षा झाली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळाले नाही.

गेल्या पाच वर्षांत भंडारा व गोंदिया जिल्ह्याला पार्सल पालकमंत्रीच लाभले. आता फडणवीस सरकारमध्ये देखील पुन्हा जिल्ह्याच्या नशिबी पार्सल पालकमंत्रीच येणार आहेत.या दोन्ही जिल्ह्याचा विचार केल्यास भंडारा भाजपकडे व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीकडे असे समिकरण महायुतीचे आहे.त्यातच आधी महाविकास आघाडी असतानाही भंडारा काँग्रेसकडे व गोंदिया राष्ट्रवादीकडे असे नियमच राजकारणाचा ठरलेला.असे असले तरी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय विचार केल्यास या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे(अप)कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचा वरचष्मा आहे.दिल्ली मुंबईतील नेत्यांना या जिल्ह्यातील काही निर्णय घेतांना यांचे विचार लक्षात घ्यावे लागते.आत्ता तर खा.पटेल हे महायुतीचे घटक पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याने खास करुन गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे आमदार असतांनाही पहिल्या टप्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळणे म्हणजेच एक प्रकारे विचार केल्यास प्रफुल पटेलानाच जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक जिल्ह्यातील नसावा असेच वाटत असल्यानेच ते आडकाठी निर्माण करतात असा सूर जनतेतूनच नव्हे तर महायुतीच्या घटक पक्षातील नेतेही दबक्या आवाजात बोलू लागले आहेत.

गोंदिया व भंडारा जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही.गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शेजारच्या नागपूर जिल्ह्यातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख,नंतर प्राजक्त तनपुरे,नवाब मलिक हे तर महायुतीचे सरकार येताच भाजपचे सुधीर मुनगंंटीवार व त्यानंतर गडचिरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली.धर्मरावबाबा आत्राम यांनी तर पालकमंत्री पदाचा राजीनामा सुध्दा खा.पटेल यांच्या कार्यालयातील कामांच्या दबावामुळे सोडला होता,परंतु परत त्यांनी घेतला.मात्र त्यांनाही या वादाचा फटका बसला व त्यांनाही मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले आहे.

आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातून भाजपचे ३ आमदार निवडून आले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.विशेष म्हणजे गोंदिया मतदारसंंघात तर पहिल्यांदाच कमल फुलले.तर तिरोड्यात सलग तिसर्यांदा भाजप विजयी झाली.राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली जागा कायम ठेवली. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले व गोंदियात पहिल्यांदा कमल फुलवणारे भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांचे नाव चांगलचे चर्चेत होते.आ.अग्रवालांनी विजयाचा इतिहास करण्यासोबतच ६० हजार मताधिक्यासह काँग्रेसला चितपट केले.तर अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादीचे बडोले यांनीही भाजपमधून राष्ट्रवादीत जाऊन विजय मिळविला ते फडणविसांचे निकटवर्तीय आहेत.परंतु राष्ट्रवादी अजित गटाचे असल्याने त्यांना पटेलांच्या समंतिशिवाय त्यांच्या नावाचा विचारच होऊ शकत नाही.त्यामुळे पटेलांनीही बडोलेंच्या नावाकरीता आग्रह केला असेल असे दिसून येत नाही.तर दुसरीकडे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांना निवडून द्या मंत्रीच नव्हे तर पालकमंत्री बनविण्याचे जाहीर आश्वासन प्रफुल पटेल व परिणय फुके यांनी दिले होते,मात्र मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही. तिरोडा मतदारसंघात विजयी होण्याची विजय रहागंडालेनी व भंडारा -पवनी विधानसभा मतदारसंंघातून नरेंद्र भोंडेकरने हॅट्ट्रिक केली,त्यांची देखील निराशा झाली. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे तीन आमदार विधानसभेत पोहोचले असले तरी गोंंदिया जिल्ह्याला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची शक्यता नव्हतीच.परंतु राष्ट्रवादीकडून शक्यता असतांना आता मात्र इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांवरच दोन्ही जिल्ह्याच पालकत्व येणार आहे.