तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातून गेल इंडिया लि.कंपनीची गॅस पाईप लाईन जात आहे. यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. मात्र ज्या शेतकर्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जात आहे. त्या शेतकर्यांना त्याचा मोबदला देण्यात आला असला तरी ज्या ठिकाणाहून पाईप लाईन गेली आहे. त्या ठिकाणी शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही बांधकाम करता येवू शकत नाही. परिणामी याला आता विरोध सुरू झाला असून या पाईपलाईनचा कवलेवाडा येथील शेतकर्यांनी विरोध केला असून पाईनलाईनच्या कामासाठी जमिन देणार नाही, अशी भुमिका घेतली आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील शेतकर्यांच्या शेतातून गेल इंडिया कंपनीची मुंबई – नागपूर ते झारसुकडा गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. याकरिता अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला तज्ज्ञाकडून जमिनीच्या बाजारभावाचे किमतीच्या फक्त १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. जी बाधीत क्षेत्राच्या तुलनेत खुप कमी आहे. गेल कंपनीने वीस मीटर रूंद पट्टीची जमीन बाधित क्षेत्र म्हणून वापर करण्याचा हक्क बळजबरीने संपादित करणार आहे.
२० मीटर रूंदीच्या पट्टीत शेतकर्याला कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. गुरांचा गोठा, तळे, विहीरी, पाण्याचा साठा, धरण किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. आपल्याच शेतात कोणत्याही प्रकारचे झाडे लावता येणार नाही. व तसे करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकर्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही मिळालेल्या नोटीस मधून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या पाईपलाईनच्या कामाला घेवून परिसरातील शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच कवलेवाडा येथील शेतकरी आपली शेती गेल कंपनीला द्यायला तयार नाहीत. याविषयी शेतकर्यांशी तडजोड करायला उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ( म.राज्य ) गेल इंडिया व त्यांची संपूर्ण टीम गावात आली होती.
शेतकर्यांनी आपल्या शेतात भविष्यात करणार असलेल्या योजना सांगितल्या व होणार्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी मिळवून देण्याची मागणी केली. पण तुमच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी आम्ही पूर्ण करु शकणार नाही असे सांगितले. यावर शेतकर्यांनी गॅस पाइपलाइनसाठी एकमताने विरोध केला. आमच्या परवानगी शिवाय शेतात कोणत्याही प्रकारचे काम करु नये, असे सांगितले. यामुळे गॅस पाईनलाईन काम बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कोणती भुमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य व शेकडो शेतकरी, नागरीक उपस्थित होते.
गेल इंडिया कंपनीच्या (GAIL India pipeline) वतीने सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. कंपनीच्या जाचक अटी शेतकर्यांना मारक ठरत आहेत. परिणामी गावागावात या पाईपलाईनला विरोध दर्शविण्यात येत आहे. आपल्याच शेतीत शेतकर्यांना आखलेल्या योजना व इतर उद्योग व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शेतकर्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.शेतजमीन विक्री करायची वेळ येईल व विक्री करायचीही असल्यास मातीमोल भावाने द्यावी लागेल आणि शेतकरी रस्त्यावर येईल, अशी शंकाही शेतकर्यांच्या मनात निर्माण होवू लागली आहे.