गोंंदिया जि.प.वर महायुतीचा झेंडा अध्यक्षपदी भाजपचे लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष राकाचे हर्षे

0
357
: कॉंग्रेसने मागे घेतला अर्ज
गोंदिया-. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरीता आज, 24 जानेवारी रोजी निवडणूक झाली. त्यासाठी कमी सदस्यसंख्या असतानाही महाआघाडीकडून कॉंग्रेसने दोन्ही पदांकरीता अर्ज दाखल केले होते.मात्र सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सामंजस्याने केलेल्या चर्चेनंतर काँग्रेसने आपले दोन्ही अर्ज मागे घेतले. परिणामी अध्यक्षपदी भाजपचे बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्राचे लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घाटटेमनी क्षेत्राचे सदस्य सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड झाली. आता सभापतीपदाच्या निवडणुकीतही हाच फॉर्म्यूला राहणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक 2022 मध्ये झाली. 53 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे 26, कॉंग्रेसचे 13, राष्ट्रवादीचे 8, आमदार विनोद अग्रवाल यांच्या चावी गटाचे 4 आणि अपक्ष 2 सदस्य निवडून आले.पहिल्यांदा सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि दोन्ही अपक्षांनी भाजपला साथ दिली. त्यावेळी अध्यक्षपदी पंकज रहांगडाले यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर यांची निवड झाली. त्याचबरोबर राष्ट्रवादीला एक सभापतीपद, तर भाजपला दोन, राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष एक सभापतिपद मिळाले होते. मधातच विधानसभा निवडणूक आल्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट दोन वर्षांवरून अडीच वर्षांवर गेली. अखेर आज, 24 जानेवारी रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरीता निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोन्ही पदे जुन्याच फॉर्म्युल्यानुसार राहतील, हे आधीच ठरले होते. त्यानुसार आज, दुपारी 12 वाजता अध्यक्षपदाकरीता भाजपकडून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी जि.प. क्षेत्राचे सदस्य आणि आमदार राजकुमार बडोले यांचे निकटवर्तीय समजण्यात येणारे लायकराम भेंडारकर यांनी अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्षपदाकरीता जुन्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घाटटेमनी जि. प. क्षेत्राचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश हर्षे यांनी अर्ज दाखल केला. तर कॉंग्रेसकडून अध्यक्षपदाकरीता सशेंद्र भगत आणि वंदना काळे यांनी उपाध्यक्षपदाकरीता नामांकन दाखल केले होते. मात्र कॉंग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी नामांकन परत घेतले. परिणामी भाजपचे लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीच्या वेळी आमदार इंजि.राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय रहागंडाले,माजी आमदार राजेंद्र जैन,भैरसिंह नागपूरे,खोेमेश्वर रहागंडाले व माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे यांची विशेष उपस्थितीत होती.
सभापतीपदासाठी 11 ला निवडणूक
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज ठरले. त्यांची बिनविरोध निवड झाली. आता पाचही विषय समित्यांसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात अर्थ व बांधकाम, महिला बालकल्याण ही पदे भाजपकडे होती. तर राष्ट्रवादीकडे समाजकल्याण आणि शिक्षण व आरोग्य ही पदे होती. तर एका अपक्षाकडे कृषी व पशुसंवर्धन खाते होते. आता पदांचा हाच फॉर्म्युला पुढच्या अडीच वर्षांसाठी कायम राहणार आहे. चेहरे मात्र बदलणार असून कोणत्या चेहऱ्याला पसंती मिळते, हे बघणे औत्सु्क्याचे ठरणार आहे.