
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महायुतीचा झेंडा,काँग्रेसला झटका
भंडारा,दि.२८ : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा मोठ्या फरकाने पराभव करीत दुग्ध सहकारी संस्था गटातून राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते सुनिल फुंडे यांनी त्यांचा ४४ मतांनी पराभव केला.हा पराभव खासदार पडोळे यांचा नसून एकेकाळी सुनिलभाऊंच्या खांद्यावर आपल्या निवडणुका लढून विजय मिळविणार्या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा असल्याचा सूर आवळला जात आहे.
भंडारा लोकसभा मतदारसंघात नानाभाऊ व सुनिलभाऊ ही जोडी मैत्रीची एक वेगळीच ओळख होती.सुनिलभाऊ राष्ट्रवादीत असतानाही नाना पटोले हे भाजपकडून खासदार झाल्यावरही त्यांनी मैत्रीला टिकवून ठेवण्याचाच प्रयत्न केला.मात्र त्यानंतर काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत दोन्ही मित्रामध्ये बिनसले आणि त्या बिनसलेल्या मैत्रीने पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीतच नानांना धक्का दिला,अवघ्या काही मतांनी निवडून यावे लागले.त्यानंतर आता बँकेच्या निवडणूकीत साकोली तालुक्यातील सेवा सहकारीसह खासदारला पराभूत करुन सुनिलभाऊंनी आपल्याशी झालेला दगाफटका या विजयातून चुकता केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल फुंडे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सहकार पॅनलला ११ जागा मिळाल्या, तर, काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलला फक्त ४ जागा मिळाल्या. यामुळे आता सुनिल फुंडे यांचा अध्यक्षपदाचा मार्ग दुसऱ्यांदा मोकळा झाला आहे. असे असले तरी, न्यायालयाच्या निर्णयामुळे ५ गटामधील ६ जागांचा निकाल रोखून ठेवण्यात आला आहे.
२१ संचालकपदासाठी ही निवडणूक २७ जुलैला घेण्यात आली होती. यात महायुतीचे सहकार पॅनल आणि काँग्रेसचे परिवर्तन पॅनल रिंगणात होते. विविध २० गटांमधून ४६ उमेदवार मैदानात होते. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपावरून मतदानाच्या आदल्या दिवशी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच गटातील निकाल पुढील निर्णयापर्यंत रोखून ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ५ गटांमधील ६ जागांचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले नाहीत.
काँग्रेसच्या गटाला हादरा,आत्मचिंतनाची गरज
सहकार क्षेत्रातील या निवडणुकीने काँग्रेसला जोरदार हादरा दिला आहे. दुग्ध सहकारी संस्था गटातून खुद्द खासदार प्रशांत पडोळे उमेदवार होते. आमदार नाना पटोले हे सुद्धा पॅनलच्या विजयासाठी प्रचारात उतरले होते. मात्र या दोन्ही दिग्गजांची ताकद पॅनलला वाचवू शकली नाही.वास्तविक खासदार पडोळे हे लोकसभेत ज्या पध्दतीने विजयी झाले,त्यानंतर त्यांना आपण खुपच लोकप्रिय नेते असल्याचा भास झाल्याने दुग्धसंंघापाठोपाठ जिल्हा बँकेतही स्वतः निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.गेल्या खासदारकीच्या वर्षभरातील कार्यकाळाकडे बघितल्यास ठोस असा कुठलाच कार्य दिसून येत नाही.त्यातच भाजप व राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुतीची बाजू भक्कम झालेली होती.परंतु स्वतःला काँग्रेसचे सर्वेसर्वा समजून मी म्हणजेच काँग्रेस हे घेऊन चाललेल्या नेत्यांमुळेच भंडाराच नव्हे तर गोंंदियातील बँकही हातातून गेली ही चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
सहकार पॅनल विजयी उमेदवार
1) सुनिल फुंडे- दुग्ध सहकारी
2) श्रिकांत वैरागडे- प्रक्रिया
3) प्रशांत पवार-औद्योगिक सहकारी
4) कैलास नशिने-मजूर
5) प्रदिप पडोळे-पतसंस्था
6) संदिप फुंडे -पगारदार
7) रुबी चड्डा-वैयक्तिक
8) अनिल सार्वे – विविध भंडारा
9) विश्वजित कारेमोरे-विविध मोहाडी
10) हेमराज कापगते-विविध साकोली
11) धर्मेंद्र बोरकर- विविध लाखनी
परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार
1) चंपकलाल कटरे-विविध तुमसर
2) प्रदिप बुराडे -विविध लाखांदुर
3) मोहीत मोहरकर-विविध पौनी
4) अजय मोहनकर – मच्छिमार
स्थगित
जंगल कामगा व खरेदी विक्री 1 सीट
भटक्या विमुक्त जाती/1 सीट
महिला राखीव 2 सीट
अनुसित जाती/जमाती 1 सीट
खुला प्रवर्ग 1 सीट





