प्रकाश जावडेकरांचा जावईशोधः नेहरूंना ठरविले हुतात्मा

0
8

छिंदवाडा (मध्य प्रदेश) – नेत्यांच्या वाचाळपणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या भाजपला आता केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अडचणीत आणले आहे. येथे तिरंगा यात्रेमध्ये भाषण करताना जावडेकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांना चक्क हुतात्मा ठरविले आहे. जावडेकरांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तिरंगा यात्रेत उत्साहाच्या भरात भाषण करताना जावडेकर म्हणाले, की 1857 मध्ये जी लढाई सुरू झाली ती पन्नास वर्षे चालली. पुढे ब्रिटिशांना हाकालून दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना माझा सलाम. मी त्यांना प्रणाम करतो. किती वीर झाले. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू हे सर्वजण देशासाठी फासावर चढले. क्रांतिवीर सावरकर आणि आणखी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी प्राणाचा त्याग केला.‘‘