अखेर कंत्राटी अभियंता रूपेश दिघोरेंचे निधन

0
6

नागपूर- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता यांचा गेल्या ५ तारखेला अपघात झाला होता. आज दुपारी नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
सविस्तर असे की, रूपेश दिघोरे हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत कुरखेडा तालुक्यात गेल्या १० वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. गेल्या पाच तारखेला कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव या साईटवरून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका भरधाव दुचाकीने धडक दिली. गडचिरोली जिल्ह्यात अपुèया वैद्यकीय सेवेमुळे दिघोरे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उशीर झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला होता. पोटाला जबर दुखापत झाल्याने त्यांचेवर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. अखेर १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचेवर काळाने झडप घातली.
उल्लेखनीय म्हणजे त्यांना उपचारासाठी तब्बल १७ लाखाचा खर्च आला. त्यापैकी ५ लाखाची मदत प्रधानमंत्री सडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली. परंतु, शासनाने त्यांना काडीचीही मदत केली नाही, ही शोकांतिका आहे. दिघोरे यांच्या मागे एक सहा वर्षाचा मुलगा, पत्नी व आईवडिलांच्या संगोपनाची जबाबदारी होती. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या योजना या अल्प मानधनावर कंत्राटी अभियंत्याकडून राबविल्या जातात. परंतु, त्यांच्या वैद्यकीय सुविधांची शासन कसलीही दखल घेत नाही, याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.