चार जिल्ह्यांचा महामेरू ‘दादा’ निरुपला
गोंदिया,दि.29. राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस(अप)गटाचे अध्यक्ष अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांनी गोंदिया जिल्ह्याला भरभरून निधी दिली. त्यात त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे धापेवाडा सिंचन प्रकल्प आहे. या उपसा सिंचन प्रकल्पाला त्यांनी ९१७ कोटी रुपये देत मुहूर्तमेढ रोवली होती.त्यासोबतच त्यांचा ९ मार्च २०२४ हा गोंदिया जिल्ह्यातील अखेरचा दौरा ठरला.त्यांनी या दौर्यात महिंलाकरीता आपण मोठं करणार असे आश्वासन दिले होते,त्यानंतर २८ जून २०२४ रोजी लाडकी बहिण योजना महिलाकरीता अमलात आली.अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून काम करतांना धान उत्पादक शेतकर्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्वाधिक बोनसची रक्कम त्यांनी अर्थमंत्री म्हणून ७०० रुपये प्रति क्विंटलची घोषणा २०१९ मध्ये नागपूरच्या अधिवेशनात केली होती.आता त्यांच्या अकाली एक्झीटने या सर्व आठवणी राहिल्या असून जिल्ह्याच्या विकासाला माेठा धक्का बसला आहे.
गोंदिया जिल्हा राज्याच्या पूर्व टोकावरील आहे. त्यातच या जिल्ह्याची ओळख नक्षलग्रस्त, आदिवासीबहूल आणि मागासलेला अशी आहे. या जिल्ह्यात रोजगार नाहीत. या जिल्ह्याकडे नेहमीच राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. मात्र कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर ज्यावेळी अजित पवार यांच्याकडे जलसंपदा आणि अर्थमंत्री पदाचा कारभार आला. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात अकाली निधन झाल्याने जिल्ह्यातही त्यांच्या अचानक जाण्याने धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे त्यांचे चांगले संबध राहिले आहेत..रोखठोक भूमिकेमुळे ते नेहमी चर्चेत राहायाचे. गोंदियात तसे ते फारसे अधिक आले नाहीत.राष्ट्रवादीची धुरा ही प्रफुल पटेलाकंडे राहिल्याने त्यांमुळे हस्तक्षेप टाळला. मात्र सिंचनाच्या माध्यमातून विकास व्हावा याकरीता तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे मंजूर करण्यात आलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला २००५ मध्ये ते तिरोडा येथे येऊन गेले. त्यावेळचे त्या भागाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनसोड होते.
श्री. बनसोड यांच्याशी त्याचे चागले संबध होते. विशेष म्हणजे दिलीप बनसोड यांनी काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतरही दादा सोबत त्यांच्या संपर्क राहिला. नव्हे, तर दादा हे त्यांच्या संपर्कात अनेकदा अप्रत्यक्ष आल्याचे बघावयास मिळाले.त्यानंतर २००७ मध्ये धापेवडा उपसा सिंचन योजनेच्या टप्पा १ च्या भूमिपूजन कार्यक्रमाकरीता २००७ मध्ये येत त्यांनी बॅरेजच्या निर्मितीकरीता ९१७ कोटी रुपयाची मंजुरी दिली होती. याच कार्यक्रमात आपल्या मिश्किल शैलीत त्यांनी धरणात पाणी नसेल तर ‘मी येऊन मुतायचे का’ अशा शब्दांचा वापर केल्याने त्यावेळी राजकारणासोबत नागरिकाच चर्चेचे विषय ठरले होते. मात्र त्याच अजित पवारांनी धापेवाड़ा उपसा सिंचन योजनेकरीता २ हजार कोटी रुपये मंजूर केले.
तर गोंदियाच्या नवनिर्मित केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उदघाटनाकरीता आल्यावर त्यांनी लोकार्पणापूर्वी इमारतीची पाहणीकरीता आपल्या रोखठोक भाषेत इमारतीच्या बाधकामावर नाराजी व्यक्त करीत अशा निकृ्ष्ठ बांधकामाचे लोकार्पण माझ्या हातून होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत कंत्राटदारासह कार्यकारी अभियंत्यावर कारवाईचे निर्दश दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात फारसे न आलेले अजित पवार २०१४ मध्ये गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित निराधार मेळाव्यात आले होते. त्यावेळी पक्ष संघटनेवर त्यांनी युवकांना सहभागी होण्याकरीता प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
२०१८ नंतर थेट २०२४ मध्ये गोंदियात
२०१८ मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता ते तिरोडा येथे रस्तामार्गाने येत असताना तिरोडा तालुक्यातील सरांडीजवळ झालेल्या अपघातातील जखमींना ताफा थांबवून त्यांनी मदत केली होती, त्यानंतरच ते प्रचारसभेकरीता निघाले होते.त्या प्रचारसभेनंतर त्यांनी माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरी जेवण केले होते.२०१८ नंतर सरळ २०२४ मध्ये जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याला अजित पवारांनी हजेरी लावली होती.
दादा गेल्याने आम्ही पोरके
अजित दादा यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीमुळे माझा संपर्क आला. मी जेव्हा-जेव्हा अजित पवार यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत भेटलो. तेव्हा त्यांनी आपुलकीने विचारणा केली. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र आता दादा गेल्यामुळे आम्ही पोरके झालो. खुद्द प्रफु्ल्ल पटेल देखील माझ्याशी केवळ दोन मिनीट बोलले. ते देखील रडायला लागले.
राजेंद्र जैन, माजी आमदार
अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून समाजमनावर खोल शोककळा पसरली आहे. एका अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या लोकनेत्याचा असा अकाली अंत होणे ही राज्यासाठी मोठी हानी आहे.
राजकारणात सक्रिय असतानाच त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण, विषयांची तयारी आणि निर्णयक्षम नेतृत्व यांचा ठसा उमटवला होता. सत्ता, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकरी, कष्टकरी आणि दुर्बल घटकांचे हित हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते. त्यामुळेच ते केवळ राजकारणी नव्हे, तर लोकांचा नेता म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. महाराष्ट्राने आज एक अनुभवी मार्गदर्शक, प्रभावी नेतृत्व आणि संवेदनशील व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. लायकराम भेंडारकर,अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया




