कारधा चौकात आंदोलनाचा भडका!
भंडारा,दि.१५ः- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि सामान्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज कारधा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य जलसमाधी आंदोलनाने’ अत्यंत तीव्र रूप धारण केले आहे. कडक उन्हाची तमा न बाळगता खासदार डॉ. प्रशांत पडोळे,आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते गेल्या ५ तासांपासून पाण्यात उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही शासन आणि प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
’आता शांत बसून चालणार नाही’ चा दिला नारा
”आता शांत बसून चालणार नाही, अन्यायाविरुद्ध निर्णायक संघर्ष” अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील खरीप (२०२५) हंगामातील धान खरेदी केंद्राबाहेर हजारो पोती पडून आहेत. शेतकऱ्यांना ना धानाचा चुकारा मिळत आहे, ना बोनसची रक्कम खात्यात जमा झाली आहे. या सर्व अन्यायाविरोधात आणि झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
धान खरेदी व बोनस: खरीप हंगामातील धान खरेदीची मर्यादा (लिमिट) तातडीने वाढवावी, खरेदी केलेल्या धानाचा चुकारा आणि बोनसची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी.
स्वतंत्र ओबीसी जनगणना: जनगणनेच्या प्रपत्रकात ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) देऊन ओबीसींची अचूक जनगणना करण्यात यावी.
प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन: गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसन त्वरित करावे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, तसेच भेल व रोहना प्रकल्पातील शेतकऱ्यांना जमिनी परत कराव्यात.
लाडकी बहीण योजनेतील सावळागोंधळ: निवडणूक जिंकण्यासाठी महिलांकडून फॉर्म भरून घेतले आणि नंतर पात्र महिलांनाही यादीतून वगळून लाभ नाकारण्यात आला, तो अन्याय दूर करावा.
वीज संकट व लोडशेडिंग: ग्रामीण भागातील तीव्र लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना नवीन कृषी वीज कनेक्शन देण्यात यावेत.
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व तस्करी: जिल्ह्यातून होणारी रेतीची अवैध तस्करी थांबवावी आणि तरुणाईला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांच्या (एमडी ड्रग्स, गांजा) तस्करांवर कठोर कारवाई व्हावी.
प्रशासकीय अनास्थेमुळे रोष वाढला
पाण्यात उतरून ५ तास उलटून गेले तरी प्रशासनाचा एकही मोठा अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही. आमदार नाना पटोले आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी आरोप केला आहे की, केंद्र व राज्य सरकार जाणीवपूर्वक भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.पाण्यात ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय किंवा आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जलसमाधी आंदोलन मागे घेतले जाणार नाही. या आंदोलनामुळे कारधा परिसर आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





