पणनमंत्री चंद्रकांत पाटील पळपुटे-राजू शेट्टी

0
9

पुणे – आडत कपात रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टीकेची झोड उठवली आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पाटील यांना पळपुटे ठरवत रस्त्यावर उतरून त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेट्टी म्हणाले, ह्यआडत रद्द करण्याच्या निर्णयाला ताबडतोब स्थगिती देत राज्य शासनाने संघटित व्यापाऱ्यांपुढे थेट गुडघेच टेकले आहेत. आडत्यांच्या संपाच्या धमकीपुढे शासनाने नांगी टाकली. बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गुंडांचेच वर्चस्व असल्याचे यामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.

शेतमाल विक्रीनंतर बाजार खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातात फार मोठी रक्कम पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बोकांडी असलेली आडत रद्द करून ती खरेदीदारांकडे देण्याचा निर्णय योग्यच होता. वास्तविक शेजारच्या गुजरातमध्येही शेतकऱ्यांकडून आडत वसुली होत नाही. यामुळे व्यापाऱ्यांचे कोणतेच नुकसान होत नाही, तरीही शेतकऱ्याचाच बळी देण्याचा शासनाचा विचार दिसतो.
या निर्णयावर शासनाने पुनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यावाचून दुसरा मार्ग आमच्यापुढे उरणार नाही,ह्ण असा इशाराही शेट्टी यांनी दिला. आडत व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या असंघटितपणाचा गैरफायदा उचलू नये, असा इशारा त्यांनी दिला.