विदर्भाकरिता मुडदे पाडायची वेळ आली -जांबुवंतराव धोटे

0
9

नागपूर-‘अखंड महाराष्ट्रात सामील झाल्यादिवसापासून विदर्भावर केवळ अत्याचारच झालेला आहे. वेग‍ळ्या विदर्भाची मागणी काँग्रेसच्या तर अजेंड्यांवरच नाही आणि भाजपने खुर्चीच्या मोहापायी आपला अजेंडाच बदलला. विदर्भातील शेतकरी असो वा ११४ गोवारी आदिवासी असोत, नेहमी विदर्भानेच बलिदान दिले आहे. मात्र, आता विदर्भाकरिता मुडदे पाडायची वेळ आली आहे. विदर्भाच्या मातीत भगतसिंग, चंद्रशेखर आझाद जन्माला यावेत आणि इथल्या युवकांनी सगळ्या मंत्र्यांच्या सभा उधळून लावाव्यात,’ असे प्रक्षोभक आवाहन फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी गुरुवारी येथे केले.

फॉरवर्ड ब्लॉकतर्फे वेग‍ळ्या विदर्भाकरिता ५ डिसेंबरपासून साखळी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. यात पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पाळीपाळीने सहभाग घेतला. स्वतः धोटे धरणे आंदोलनाकरिता बसले होते. मात्र, गुरुवारी या आंदोलनाचा शेवट करण्यात आला. या आंदोलनाला संबोधित करताना धोटे बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतः वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. मात्र, सत्ता आली, खुर्ची दिसली आणि त्यांना सत्तेचा मोह अनावर झाला. ज्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बाप काढला आणि स्वतः भाजपने ज्या पक्षाला खंडणीबाजांचा पक्ष म्हणून हिणवले त्यांच्याशीच युती केली. ही युती अभद्रच नाही पूर्णतः अनैसर्गिक असल्याची टीकासुद्धा धोटे यांनी यावेळी केली.

हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या प्रस्तावावर भाजपने चर्चासुद्धा होऊ दिली नाही. यावरून भाजपचा खोटारडेपणा दिसून येतो. त्यामुळे राज्य सरकारचे मंत्री विदर्भात आल्यास त्यांना अडवा, त्यांच्या सभा उधळून लावा, असे आवाहन धोटे यांनी यावेळी केले.