संघ प्रचारक हाेणार मोदींसाठी “गुप्तचर’

0
8

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील राजकीय परिस्थिती, संवेदनशील व महत्त्वाच्या घडामोडी तातडीने कळाव्यात आणि गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या प्रचारकांच्या मदतीने पर्यायी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रचारकांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर तत्काळ पावले उचलण्याची यंत्रणाही पंतप्रधान कार्यालयात उभारण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या अहवालांमध्ये कळविण्यात आलेले अति गंभीर वा संवेदनशील प्रश्न पाच दिवसात सोडविण्याच्या स्पष्ट सूचना संघाने मोदींना केल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात अलीकडे झालेल्या बैठकांमध्ये मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारबाबतही सखोल चर्चा झाली. यावेळेस मोदी सरकारला राजकीय इनपुट किंवा इंटेलिजन्स देणारी संघाची एक यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले. यानुसार देशभरातील जिल्हा पातळीवरील प्रमुख प्रचारकांवर ही जबाबदारी देण्यात आलीय. जिल्हा प्रचारकाने दर २४ तासाला आपापल्या जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घडामोडींवर आधारित एक अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. या अहवालात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घडामोडी, ज्वलंत प्रश्न, राजकीय पेच यांची मािहती असेल. िजल्हा प्रचारकांना तालुका प्रचारकांनीही अहवाल द्यावयाचा असून त्यांच्या अहवालावर आधारित िजल्हा प्रचारकांचे अहवाल तयार केले जातील. देशभरातून हे अहवाल पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे जातील. या अहवालातील संवेदनशील व महत्वाची माहिती पुढच्या तासाभरात मोदींना कळविणे सिंह यांना बंधनकारक असेल. या अहवालांच्या आधारावर मोदींनी आपले निर्णय घेणे किंवा घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करणे अपेक्षित आहे. तसेच देशभरातील अति महत्वाचे प्रश्न,पेच वा अडचणी भलेही ते कोणत्याही प्रदेशातील व कोणत्याही विचार व पक्षांशी संबंधित असोत , ते पुढील पाच दिवसात सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न मोदी करतील, असेही ही यंत्रणा निश्चित करताना ठरविण्यात आले आहे.