गडकरींच्या षष्ठ्यब्दीपूर्तीला शहा, पवार, शिंदे येणार

0
16

नागपूर,दि.12 : भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ६ वाजता त्यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या वेळी शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन गडकरी यांचा सत्कार केला जाईल. या भव्य सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंघ रावत, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री नितीन गडकरी षष्ठ्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे कार्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.संयोजक ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहसंयोजक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे आहेत. सोहळ्यासाठी भाजपातर्फे जय्यत तयारी सुरू आहे.नागपूर, विदर्भासह राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.