केजरींविरोधात लढण्यास तयार!: बेदी

0
7

नवी दिल्ली-दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी राजधानीतील राजकीय वातावरणात रंग भरण्यास सुरुवात केली आहे. ‘अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात थेट लढत देण्यास मी तयार आहे,’ अशी गर्जना बेदी यांनी केली आहे. बेदी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेमकी काय भूमिका घेतो याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

दोन वर्षांपूर्वी जंतरमंतर येथे झालेल्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात किरण बेदी आणि केजरीवाल यांनी एकत्र काम केले होते. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. केजरीवाल यांनी आंदोलनाचा ट्रॅक बदलून राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर बेदी यांनी त्यांच्यासोबत जाणे टाळले होते. त्याच बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच बेदी या केजरींच्या विरोधात निवडणूक लढतील, असे तर्क लढविले जात होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही त्या निवडणूक लढतील असं जाहीर केलं, पण त्यांचा मतदारसंघ कोणता असेल याविषयी सांगण्याचं टाळलं. त्यामुळं तर्कवितर्क सुरूच होते. अशातच बेदी यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरींशी थेट ‘दोन हात’ करण्याची तयारी दाखवली. केजरींशी लढण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही,’ असं त्या म्हणाल्या. भाजपकडून त्यांना हिरवा कंदील आल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.