नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे. कॉंग्रेसने आज (शनिवारी) आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती आरोप केले. आपने जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांना भ्रमित केल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव अजय माकन यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल जनतेला दिलेले एकही वचन पूर्ण केले नाही. उलट, वेळोवेळी युटर्न घेऊन जनतेची दिशाभूल केल्याचे अजय माकन यांनी म्हटले आहे. माकन यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवालांवर टीका केली.
दिल्लीत 2013 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून आम आदमीप्रमाणे व्यवहार करू, सरकारी वाहनांचा वापर करणार नाही तसेच सरकारी सुरक्षेसह निवासस्थान नाकारणारे केजरीवाल खोटारडे असल्याचे माकन यांनी म्हटले. केजरीवाल यांच्यानी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख करत माकन यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
माकन म्हणाले, 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनलेल्या केजरीवाल यांनी सरकारी वाहन नाकारले असले तरी आठ खोल्यांचा मोठा सरकार निवासस्थानाची मागणी केली होती. केजरीवाल यांनी प्रत्येक निर्णय घेताना जनमत जाणून घेतल्याचा देखावा केला. केजरीवाल यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच दिल्ली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. केजरीवाल यांनी तेव्हा जनमत का जाणून घेतले नाही? असा सवाल माकन यांनी उपस्थित केला.