मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका-खासदार पटोले

0
6

नागपूर,दि.09 : आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी सुरवातीपासूनचीच भूमिका असून ती मी सोडणारही नाही व मोडणारही नाही. परंतु माझ्या वैयक्तिक कार्यक्रमावर जाऊन मला डिवचण्याचा प्रकार करु नका अशा इशारा भाजपाचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आज नागपूरात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला.
पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष करीत आहेत.त्यांच्या या भूमिकेवर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत घेत पटोले हे ‘आदत से मजबूर’ असल्याची टीका करीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार पटोले यांनी  आज गुरुवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पटोले म्हणाले, पक्षाच्या पुणे येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मी शेतकºयांचे प्रश्न उघडपणे मांडले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीतही तेच मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वळोवेळी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे भंडारी यांनी मला नाहक सल्ले देऊ नयेत. भंडारी यांची स्वत:ची अवस्था बिकट आहे. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने मधल्या काळात ते गायब होते, असा चिमटा त्यांनी काढला. माझे घर काचेचे नाही. पण कुणाची घरे काचेची आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही प्रामाणिकपणा पाळा. शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन नंतर परत घेतले. हे तुमच्या अप्रामाणिकपणाचे प्रमाणपत्रच असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली.
भंडाऱ्याच भाजपचा पत्ता साफ होता, त्या काळात आपण पक्ष उभा केला. मला जनतेने निवडून दिले आहे. मी पक्षाच्या किंवा नेत्यांच्या भरवशावर नाही. फेब्रुवारीनंतर राजकीय दिशा स्पष्ट करीन, असे त्यांनी एकाप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नोटाबंदीनंतर किती काळे धन परत आले, किती नकली नोटा जमा झाल्या ते आधी जाहीर करा. लाखो लोकांना त्रास झाला. तीनशे नागरिकांचा बँकेच्या रांगेत मृत्य झाला. आपण कशाचा जल्लोष साजरा करीत आहोत, असा सवाल त्यांनी केला.