गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या
नांदेड,दि.09ः-जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने कापसाच्या पिकावर थैमान घातले असून परिणामी शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध कंपन्यांच्या जातीचे कापसाचे बियाण्याची लागवड केली होती. सुरूवातीला झाडाची उंची वाढली. मोठ्या प्रमाणात बोंडेदेखील लागले. बोंडाचा आकार ज्याप्रमाणे वाढत जाऊ लागला, तसा प्रत्येक कापसाच्या बोंडामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे बोंड फुटलेच नाही. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
जिल्ह्यातील लाखो हेक्टरवर कपाशीचे पीक शेतकऱ्यांनी घेतले असून गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे पीक वरून हिरवेगार पण आतून पूर्णत: नष्ट झाले आहे. कपाशीचा खरीप हंगाम पूर्णत: हातातून गेला असून कापसाचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील दोन वर्षातील शेती व्यवसायावरील अरिष्ट व सरकारचा सुलतानी कारभारामुळे बळीराजा आर्थिक पेचात सापडल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. अशा बिकट परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. राज्य सरकारने ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान झाले अशा शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी शेतीचा पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
कापूस बियाणे अधिनियम 2009 च्या तरतुदीनुसार बीटी कंपन्यांनी कापसाच्या बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास संबंधित बीटी उत्पादक कंपनीवर शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई व गुन्हे दाखल करता येतात. या आधारे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कंपनीकडूनसुद्धा आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही भागवत देवसरकर यांनी केली.




