यवतमाळ,दि.18ः –शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी लावून धरण्यासाठी त्यांना सोबत घेऊन १ ते ११ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल दिंडी काढणार असल्याची घोषणा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी यवतमाळमध्ये केली. जिल्ह्यातील कपाशीवर झालेल्या बोंडअळीच्या आक्रमणाची स्थिती पाहण्यासाठी ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
या वेळी ते म्हणाले, या सरकारच्या अनेक धोरणांमुळे अर्थव्यवस्था संकटात व व्यापारी रस्त्यावर आले आहेत. कामगार कपात होत असून ही भयावह बाब आहे. बोंडअळीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी प्रत्यक्षात होणार नाही तोपर्यंत काही खरे नाही. ही बाब लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांची दिंडी काढण्याची योजना आखली आहे. १९८० मध्ये आपण अशीच दिंडी काढली होती. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथून दिंडीची सुरुवात होईल. दरम्यान, विविध ठिकाणांवरून निघणाऱ्या दिंड्या वर्धा येथे एकत्र येतील. तेथून त्या सर्व एकत्रितपणे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकतील, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भाच्या चार दिवसीय दौऱ्यात शुक्रवारी पवार यांनी नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे भेट देऊन बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. राजाभाऊ दहापुते, सागर लोखंडे या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले, कोणतेही बियाणे बाजारात येण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी शासनाच्या कृषी विभागाकडून होते. त्यानंतर बियाण्यांना परवाना देण्यात येतो. नंतर ते बियाणे सर्टीफाइड होतात. तेच बियाणे या शेतकऱ्यांनी घेतले. शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान होत असेल तर या बियाण्यांना सर्टीफाइड केलेल्या सरकारने त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई दिलीच पाहिजे, असेही पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, आमदार मनोहरराव नाईक, ख्याजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया उपस्थित होते.





