राज्यात “ट्विटर’वरील सरकार : तटकरे

0
15

मुंबई : भाजप-शिवसेना युतीचे सरकार 100 दिवसांत एकही आश्‍वासन पूर्ण करू शकले नाही किंवा त्यादिशेने ठोस पाऊलही उचलू शकले नाही. ते केवळ ट्विटरवरून घोषणा करणारे सरकार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी (ता.5) सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी भवनमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारने सत्तेवर येताच राज्यातील कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले. हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेले पॅकेज आजपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. केंद्र सरकारने इतर राज्यांना दोनदा पॅकेज जाहीर केले; परंतु महाराष्ट्राला एकदाही मदत केली नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे तटकरे म्हणाले.

आघाडी सरकारने राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर यांसारख्या आपत्तीकाळात शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. सध्याचे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत उदासीन आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दूध, सोयाबीन, कापूस, ऊस यांसारख्या पिकांच्या दराबाबतही सरकार गंभीर नाही. त्यांनी अद्याप भात खरेदी केंद्रेही सुरू केलेली नाहीत. आघाडी सरकारच्या काळात भाताला दिला जाणारा बोनस या सरकारने बंद केला आहे. तसेच अन्नसुरक्षा योजनेनुसार “एपीएल‘ शिधापत्रिकाधारकांना आघाडी सरकारने दिलेला लाभ बंद केला. याचा फटका राज्यातील एक कोटी 75 लाख लाभार्थींना बसला आहे. एकंदरीतच युतीच्या सरकारचा 100 दिवसांचा कारभार नागरिकांचा भ्रमनिरास करणारा ठरल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे येथे 7 आणि 8 फेब्रुवारीला राज्यातील पाच हजार प्रतिनिधींचे संमेलन भरवले आहे. यात नागरिकांसमोरचे ज्वलंत प्रश्‍न आणि सरकारची भूमिका यावर सखोल विचारमंथन होईल. निवडणुकांत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला असला तरी, नव्या उमेदीने पक्षाची बांधणी करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास तटकरे यांनी या वेळी व्यक्‍त केला.