आरक्षणातील सर्व प्रवेश यंदा ऑनलाइन

0
5

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार द्यायचे 25 टक्के आरक्षणातील प्रवेश यंदा प्रथमच राज्यभरातील सर्व महापालिकांच्या हद्दीत ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहेत. गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुंबई आणि पुणे येथे ऑनलाइन पद्धतीने झाली होती. खासगी प्राथमिक शाळांत आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांतील मुलांना अशा रीतीने प्रवेश दिला जातो. या प्रवेशांना 16 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे; मात्र, मुंबई आणि पुण्यातील प्रवेश 23 फेब्रुवारीपासून सुरू होतील.

मुंबईतील 306 शाळांमधील 25 टक्के जागांवर हे प्रवेश दिले जातील. यंदा सहा जागा कमी झाल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिका शाळांत 24 मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी दिली. www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर या प्रवेशांसाठी इच्छुक पालकांना “लॉग इन‘ करावे लागणार आहे. हे संकेतस्थळ अद्याप सुरू झालेले नाही.

अधिकृत वेळापत्रक शनिवारी
पनवेल आणि नाशिक महापालिकांची प्रवेश प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 16 ते 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद महापालिकांसाठी ही मुदत 23 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत आहे; मात्र, हे वेळापत्रक अधिकृतरीत्या शनिवारी (ता. 7) जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली.