राष्ट्रवादीची उमेदवारी आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना जाहीर

0
13

मुंबई- माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना पक्षाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमन पाटील यांच्या नावाची घोषणा केली. आर आर आबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 11 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. तासगाव-कवठेमहांकळचे प्रतिनिधित्त्व करणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे 16 फेब्रुवारी रोजी कर्करोगाने निधन झाले होते.
आर आर पाटील यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी आबांच्या समर्थकांनी केली होती. काँग्रेसचे माजी खासदार प्रतिक पाटील यांनीही आबांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असे वक्तव्य केले होते. आबांच्या घरात उमेदवारी दिल्यास काँग्रेस उमेदवार देणार नाही असेही प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे. याबाबतचा ठराव त्यांनी प्रदेश काँग्रेसकडे पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागले होते. आबांची थोरली कन्या स्मिता हिचे अद्याप 25 वर्षे नसल्याने आबांच्या बंधूंच्या नावाचीही चर्चा सुरु होती. मात्र, पक्षाने आबांच्या पत्नीलाच उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.