सभापती देशमुखांविरूद्ध राष्ट्रवादीने मांडला अविश्वास प्रस्ताव

0
9

मुंबई- विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुखांविरुद्ध राष्ट्रवादीने आज दुपारी अविश्वास प्रस्ताव मांडला. राष्ट्रवादीचे आमदार अमरजित पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला. या अविश्वास प्रस्तावावर थोड्याच वेळात मतदान होणार आहे. सध्या या प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, या प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादीला भाजपची उघड साथ मिळणार आहे तर, शिवसेना तटस्थ राहणार आहे. काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने उपसभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी हा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य आहे व लोकशाहीचा गळा घोटणारा आहे असे विधान परिषदेत या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सांगितले. देशमुख यांनी विश्वास कशामुळे गमविला ते सर्वप्रथम अविश्वास प्रस्ताव सादर करणा-यांनी व त्याला पाठिंबा देणा-यांनी सांगावे असे सांगत शिवसेनेने राष्ट्रवादीसह भाजपवर कुरघोडी केली.
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीने सभापतींना पायउतार करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, तर उपसभापतिीपदाच्या बदल्यात हे पद सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली आहे. काँग्रेसशी चर्चेनंतर राष्ट्रवादीत रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. सायंकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विधान परिषद आमदारांची बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांचीही बैठक झाली. त्यात सोमवारची रणनीती आखण्यात आली.