आरे कॉलनीतील जमिन हडपण्याचा भाजपचा सुनियोजित डाव- राज ठाकरे

0
11

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी सकाळीच आरे कॉलनीला भेट दिली. गोरेगावातील आर कॉलनीत मेट्रो-3 च्या प्रस्तावित कारशेडसाठी शेकडो झाडे तोडावी लागणार आहेत. दरम्यान, यामुळे मुंबई अधिक बकाल होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यात लक्ष घातले आहे. त्याचाच भाग म्हणून राज यांनी आज सकाळी आरे कॉलनीला भेट दिली. कारशेडसाठी शेकडो झाडांचा बळी देण्यास मनसेचा विरोध आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
– आरे कॉलनीचा मुद्दा मी गेल्या 6-7 वर्षापासून मांडतोय
– राजकीय नेत्यांनी आपल्या स्वत:च्या खासगी डेअ-या चालविण्यासाठी आरे मारली
– आरे कॉलनीबाबत राष्ट्रवादी पक्षाची भूमिकाच भाजप पुढे घेऊन चाललाय
– तेच करायचे होते तर जनतेला का म्हणाला काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी आम्हाला निवडून द्या
– वरळीतील आरेच्या जमिनीवर राजकारण्यांचा डोळा
– रिकाम्या जागा कशासाठी आणि कोणासाठी विकताय, कशाला हवा विकासाच्या नावाखाली लूट
– मेट्रो- 3 साठी झाडे तोडण्यास मनसेचा विरोध
– प्रत्येक गोष्टीसाठी भाजपचा काहीतरी उद्देश आहे
– जमिनीच्या चाचण्या लोकांपासून तुम्ही लपवता आहात?
– बिल्डर, भूमाफिया व सरकार यांच्यात साटंलोटं, निवडणुकीत केलेली मदत भाजपला या रूपाने परत करायची आहे
– लोकांना विश्वासात न घेता कसे काय प्रकल्प सुरु करता?
– विकास करण्याला आपला विरोध नाही, मात्र हितसंबंध जोपासू देणार नाही, प्रकल्पग्रस्तांचं काय?
– पर्यावरणाच्या रक्षणासाठी या सरकारने काय केले?
– मुंबईची विल्हेवाट लावण्यासाठी भाजप हट्टाहास करीत आहे
– आरे कॉलनीत का, इतर जागांचा पर्याय का तपासत नाही?
शिवसेनेचे गिरगाव बंदचं आवाहन
दरम्यान, मेट्रो-3 प्रकल्पाला गिरगाव, चिराबाजार, ग्रॅण्टरोड येथील रहिवाशांचा विरोध कायम आहे. प्रकल्पबाधितांनी एकत्र येऊन चिराबाजार-गिरगाव-ग्रॅण्टरोड रहिवासी बचाव कृती समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक चिराबाजार येथील कमानी वाडीत झाली. या बैठकीला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालिका अश्‍विनी भिडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, यात कोणताही तोडगा निघाला नाही. सेना-मनसे यांच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली. आजच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्याने शिवसेनेने बुधवारी (18 मार्च) गिरगाव, चिराबाजार बंदचं आवाहन केले आहे.दरम्यान, एमएमआरसीच्या अधिका-यांनी रहिवाशांच्या सूचना ऐकून घेतल्या व त्याचा विचार करू असे आश्वासन दिले.