भाजपाचा खर्च ७0कोटी, काँग्रेसचा ७0 हजार
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ने देशभरात चर्चेत आलेल्या दाभडी गावातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर राजकारण होत आहे. याच दाभडीत गेल्या वर्षी भाजपाने शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी ७0कोटी रुपये खर्च केले होते. तर, काँग्रेसने याच गावात भाजपाच्या निषेध आंदोलनावर ७0 हजार रुपये खर्च केले.मोदी आणि त्यांचे सरकार शेतकर्यांची कशी दिशाभूल करीत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसने या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला. उपस्थित शेतकर्यांना काळा चहा पाजून मोदींच्या ‘चाय पे चर्चा’चा निषेध नोंदविला गेला. एकूणच शेतकर्यांच्या समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत.
गेल्या वर्षी भाजपाने लक्ष्य केलेले हे गाव आता काँग्रेसच्या निशाण्यावर आहे. २0 मार्च २0१४ ला लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दाभडी गावात आले होते. या कार्यक्रमाला ‘चाय पे चर्चा’ असे नाव देण्यात आले होते. या संवादासाठी देशातील १४ हजार शेतकर्यांना ऑनलाईन लोकेशन देण्यात आले होते. अर्थात हे शेतकरी मोबाईलवर ऑनलाईन होते. या कार्यक्रमासाठी मोदींचे हायटेक यंत्रणा खूप आधीपासून कामी लागली होती. ५00 शहरात ही यंत्रणा तळ ठोकून होती. संपूर्ण मीडियाने ओबी व्हॅनसह दाभडीत धाव घेतली होती. दाभडीतही चार दिवसआधीपासून या यंत्रणेचा मुक्काम होता. या संपूर्ण ‘चाय पे चर्चा’वर भाजपाने त्यावेळी ७0कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते.
आता याच ‘चाय पे चर्चा’वर काँग्रेसने निशाणा साधला आहे.केंद्रात मोदी सरकारला नऊ महिने पूर्ण झाले. दाभडीत दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन सरकारने पाळले नाही. उलट शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या नव्या भूसंपादन कायद्याचे भाजपा सरकारकडून सर्मथन केले जात आहे. शेतकर्यांच्या समस्या आणि त्यातून होणार्या आत्महत्या जैसे थे आहेत. नेमका हाच धागा पकडून काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दाभडी येथे ‘चाय की चर्चा’ या उपरोधिक कार्यक्रमाचे आयोजन २0 मार्च २0१५ ला केले होते.