घटकपक्षांची मुंबईत बैठक सुरु

0
7

-मुंबई,दि. ९- महायुतीतील घटक पक्षांना अद्यापही भाजप व शिवसेनेकडून अपेक्षा असल्याचे आजच्या बैठकीतून स्पष्ट होत आहे. मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला खासदार रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आदी प्रमुख नेते उपस्थित आहेत.
आजच्या बैठकीत कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घटकपक्षांच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात आहे. थोडा धीर धरा, सर्व काही व्यवस्थित होईल याची खात्री देतो. राजकारणात एकाच वेळी सर्व व अंतिम निर्णय घेता येत नाहीत व घेतलेही जात नाहीत असे सांगत भविष्यात सर्वांना न्याय देऊ असे दानवेंनी आश्वस्त केल्याचे भाजपमधील सूत्रांकडून कळते आहे. दरम्यान, घटकपक्षही आज कोणताही टोकाचा निर्णय घेण्याचे टाळतील असेच संकेत मिळत आहेत. तसेच भविष्यात कोणते निर्णय घ्यायचे याबाबत घटकपक्ष एक समन्वय समिती स्थापन करणार असल्याचे समजते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपपासून फारकत घ्यावी या दबावासाठी एमआयजी क्लबबाहेर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या. आजची बैठक 12 मे रोजी होणार होती मात्र ती तीन दिवस आधीच घेण्यात आली आहे.