शिवसेनेचे ‘ठाणेदार’ एकनाथ शिंदे

0
22

मुंबई-शिवसेनेचे ठाण्यातील आमदार एकनाथ शिंदे यांची निवड आपल्या गटनेतेपदासाठी केली आहे. या पदासाठी रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतरे आणि एकनाथ शिंदे अशी अनेक नावे चर्चेत होती. त्यातून उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यामागे, मोदी लाटेतही ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या गडाची फारशी पडझड न होऊ देण्याचे शिंदे यांचे कसब, रस्त्यावरील आंदोलने व सभागृहातील जोड-तोडीच्या राजकारणातले कौशल्य ही कारणे असल्याचे शिवसेना नेते सांगतात. भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याने विधिमंडळात ते भाजपच्या धोरणांवर टीका करतील. त्यातून भाजप अडचणीत येऊ शकतो. त्याबाबतचे राजकारण शिंदे चांगल्या प्रकारे करू शकतात. सभागृहात राणाभीमदेवी भाषणांसाठी शिंदे प्रसिद्ध नसले तरी राजकीय डावपेच रचण्यात शिंदे यांचा हात धरणारा एकही नेता सध्या शिवसेनेत नाही.

शाखाप्रमुख ते गटनेता
किसन नगरातला एक आक्रमक शाखाप्रमुख, ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृहनेता, जिल्हाप्रमुख, गेली १० वर्षे आमदार … अशी यशस्वी वाटचाल करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची शिवसेनेना विधिमंडळ गटनेतेपदी वर्णी लावत त्यांची पक्षनिष्ठा आणि कामाचा सन्मान केल्याची भावना ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातला जन्म आणि घरची बेताची आर्थिक परिस्थिती यामुळे कधी रिक्षा चालवून तर कधी मासे कंपनीत कामगाराची नोकरी शिंदे यांना पत्करावी लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. ठाणे जिल्ह्यात शिवसेना रुजविणारे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तालमीत शिंदेंची जडणघडण झाली. आनंद दिघेंच्या पश्चात ठाणे जिल्ह्यातली शिवसेनेला शिंदे यांच्या रुपाने समर्थ नेतृत्व लाभले. ठाणे जिल्ह्यातील पालिका आणि नगरपालिकांमध्ये भगवा फडकवत ठेवण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. पालिका आणि नगरपालिकांमधिल सत्तेची गणित जुळविण्यात त्यांचा हातखंडा आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असल्याने अनेकांनी केवळ त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवताना बंडखोर आनंद परांजपे यांचा पराभव केला होता.

काहिसा अबोल परंतु विनम्र स्वभाव, न थकता समोरच्या व्यक्तीचे गाऱ्हाणे ऐकून घेण्याची क्षमता, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा फुंकण्याची ताकद, घडयाळाच्या काट्याकडे न बघता अहोरात्र परिश्रम करण्याची वृत्ती, राजकीय विरोधकांमध्येही असलेले मानाचे स्थान, कार्यकर्ते आणि गरजूंना ‘सढळ’ हस्ते मदत करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांमुळे एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे राजकारण आणि समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. टोल विरोधातले आंदोलन आणि कोर्टाची लढाई, राज्याच्या सागरी सुरक्षेची केलेली पोलखोल, धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी धरलेला आग्रह, ठाणे मेट्रो, एक्स्टेंडेड ठाणे स्टेशनसाठी केलेला पाठपुरावा, महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात विधिमंडळ आणि रस्त्यावर केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे नाव चर्चेच राहिले. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची वर्णी लावल्याने त्यांच्या जवळपास २८ वर्षांच्या परिश्रमाचे चीज झाल्याची भावना निकटवर्तीयांमध्ये आहे. भाजपची साथ सोडण्याचा निर्णय जर शिवसेनेने घेतला तर शिंदे यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड होईल. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा ओलांडून शिंदे यांना राज्यभरात घौडदौड करण्याची संधी मिळणार आहे.