ऑलिम्पिकमध्ये पदक विजेता होण्याचा ध्यास असावा- उपसंचालक विजय संतान

0
15
* जुने कुस्ती आखाड्यांना विनामूल्य कुस्ती मॅटचे नियोजन
बुलडाणा, दि. 20 : ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या के.डी.जाधव यांनी हेलसिंकी 1952 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिले होते. आतापर्यंत देशाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कुस्ती या प्रकारामध्ये एकूण सात पदक मिळाले आहे. महाराष्ट्राला कुस्तीचे माहेरघर सुद्धा म्हटले जाते. ऑलीम्पीकमध्ये पदक विजेता होण्याचा ध्यास खेळाडूने घ्यावा, असे आवाहन विजय संतान, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे. याबाबत जिजामाता प्रेक्षागार येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव तसेच क्रीडा अधिकारी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे विद्यमानाने अमरावती विभाग मध्ये जिल्ह्यात कुस्ती कलेचा प्रसार, प्रचार व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी कुस्ती केन्द्र, जुने आखाडे व शाळा/महाविद्यालय या ठिकाणी कुस्ती मॅट नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अमरावती विभागामध्ये जिल्ह्यामध्ये कुस्तीचा विस्तार चांगल्यापैकी आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक जुनी कुस्ती चे आखाडे /तालीम आहेत. त्यांना कुस्तीची मॅट नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच जुने पारंपारिक पद्धतीचे मातीत ग्रामीण भागात मुले कुस्तीचा सराव करतात ते हळूहळू आता बंद झाले असून, कुस्ती ला आधुनिक स्वरूप आले असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीचा सराव मॅट वर होत आहे. तरी याचा सर्व जुने कुस्तीचे आखाडे यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही उपसंचालक श्री. संतान यांनी केले आहे.
सदर कुस्ती मॅट वितरणाची योजना उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक जुने आखाडे, कुस्ती प्रशिक्षण केन्द्र, शाळा, महाविद्यालय यांनी योजने चे समन्वयक लक्षमीशंकर यादव (राज्य क्रीडा मार्गदर्शक) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम,अकोला मोबाईल नंबर 9689300669 वर संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीगीरांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.