खेळाडू ही राष्ट्राची संपत्ती- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0
12
• राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धेचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 3 : खेळाडू हा राष्ट्राची संपत्ती आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कामगिरीमुळे राज्य आणि देशाचे नाव लौकिक होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडू ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
स्थानिक क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने 90 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरूष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. या दृष्टिकोनातून खेळाडूंना नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचे काम आपण क्रीडामंत्री असताना केले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा आपल्या खेळांच्या माध्यमातून देशाचं नाव उंचावत आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडूंनी देशाचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने चांगले प्रदर्शन करावे. खेळाडूंनी सांघिक भावना जोपासूनच आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बुलडाणा येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून 271 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या स्पर्धेमधूनच महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.