परभणी, दि.14 : ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2024-25 चे आयोजन बुधवारी (दि.15) रेल्वे मैदान बारामती येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व दुग्धविकास, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण पार पडणार आहे. स्पर्धा कालावधीमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीत याची मेजवानी क्रीडारसिकांना मिळणार आहे. याशिवाय फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदिपक लेझर शो यांच्याद्वारे स्पर्धेची रंगत वाढविली जाणार आहे.
राज्यातील कबड्डी खेळाडूंना प्रेरणा मिळावी व त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त व्हावी तसेच कबड्डी क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचा खेळ व त्यांचे कौशल्य पाहता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राज्यस्तरावरील पुरुष व महिलांसाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजित करण्यात येते. सन 2012 पासून कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, नागपूर, अहिल्यानगर व ठाणे जिल्ह्यामध्ये स्पर्धेचे आयोजन झाले आहे. बारामती शहर आणि परिसरात कबड्डी खेळाची अनेक अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित असून या परिसरातून अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत. बारामती शहराला दुस-यांदा या क्रीडा स्पर्धा आयोजनांचा बहुमान प्राप्त झालेला आहे. यापूर्वी सन 2009-10 मध्ये या स्पर्धेंचे आयोजन केले होते.
दि. 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित या स्पर्धेत प्रो कबड्डी स्टार-अजित चौहान, शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे, दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपुर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी पुणे जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना प्राप्त होणार आहे. व उदयोन्मुख खेळाडूंना या खेळाडूंचे कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी याकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे महानगरपालिका क्षेत्राला जिल्ह्याचा दर्जा देऊन शहर व जिल्हा संघ सहभागी होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा असे 3 संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अधिकची संधी यामुळे प्राप्त होणार आहे.
उद्यापासून सुरु होणारी ही स्पर्धा साखळी व बादफेरी पद्धतीने खेळविली जाणार असून 19 जानेवारीपर्यत सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावर प्रकाशझोतात सामने होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे एकूण 16 महिला व 16 पुरुष असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत एकूण 32 संघामधील खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रिक अधिकारी मिळून अंदाजे 548 व्यक्ती सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेस शाळा, महाविद्यालये, क्रीडासंस्था, संघटना, क्रीडामंडळे यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करावा तसेच दर्जेदार कबड्डी खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.