मुंबई, दिनांक २५ जानेवारीः केआयआयटी विद्यापीठ भुवनेश्वर येथे १९ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला रग्बी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाने दर्जेदार कामगिरी करत रौप्य पदकाचा बहुमान मिळवला. मुंबई विद्यापीठ व केआयआयटी विद्यापीठ भुवनेश्वर या दोन विद्यापीठात झालेल्या महिला रग्बी संघाचा स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना अतिशय चुरशीचा झाला. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यामुळे ५ मिनिटाचा अतिरिक्त (एक्सट्रा टाईम) डाव खेळविण्यात आला. यामध्ये केआयआयटी विद्यापीठाने १ ट्राय करून विजय मिळवला तर मुंबई विद्यापीठाच्या महिला रग्बी संघाने १५ साईड प्रकारात द्वितीय स्थान मिळवून रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश पंजाब, हरीयाना सह आदी राज्यातील ३५ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.
चंदीगड विद्यापीठ, चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष रग्बी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या पुरुष संघाने १५ साईड प्रकारात तिसरे व ७ साईड प्रकारात चौथे स्थान मिळवून खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेकरीता पात्रता सिद्ध केली. मुंबई विद्यापीठाचे पुरूष व महिला हे दोन्ही रग्बी संघ खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरले.
मुंबई विद्यापीठाकडून महीला संघात मानसी पवार, उज्वला घुगे, सोनाली शेलार, कायरा विंस्नेट्ट, वृषाली जळगावकर, सपना यादव, पौर्णिमा धिरडे, अक्षिता लाड, सांचल भोर, सारा डिसोझा, विद्या दिनकर, निता राठोड, सुमन रावत, अर्पिता तेली, मानसी महाजन, गार्गी डे, वैष्णवी पवार, पल्लवी कोकरे आणि दुर्गा भट यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर संघाला प्रशिक्षक म्हणून प्रमोद पारसी व व्यवस्थापक म्हणून डॉ. यज्ञेश्वर बागराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पूरूष संघात अखिलेश यादव, गौरव चौहान, संस्कार गुप्ता, हर्षल मिलखे, कपिल केकनिस, शिवप्रसाद, सुधांशू यादव, सतीश यादव, यतीन कालेकर, जय सोनवणे, निखिल चौहान आणि तुलसी शिर्के या खेळाडूंचा समावेश होता. पुरुष रग्बी संघास प्रशिक्षक म्हणून शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्री. भरत चव्हाण व व्यवस्थापक मनोज इंगोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महिला व पुरुष रग्बी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी या चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.