गोंदिया,दि.१६ः जय हो ग्रुप गोंदिया परिवारातर्फे सिंधी स्कूल ग्राउंडवर 10 दिवसांचा भव्य रात्रिकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी समाजातील वरिष्ठ खेळाडूंनी शो मॅचमध्ये शानदार प्रदर्शन करत स्पर्धेची सुरुवात केली.
या स्पर्धेत एकूण 18 संघांनी भाग घेतला आणि 43 रोमांचक सामने खेळले गेले. अंतिम सामन्यात विजय मार्केटिंगने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सिंधु फ्रेंड्स ग्रुपवर विजय मिळवला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. विजेता संघाला ₹25,000 रोख बक्षीस तर उपविजेता संघाला ₹15,000 रोख बक्षीस जय हो ग्रुप परिवाराच्या वतीने प्रदान करण्यात आले.
याशिवाय, RB Photography आणि गुरु कृपा मोबाइल यांच्या सौजन्याने विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. नीलकमल फर्निचर तर्फे “कूलर मॅन ऑफ द सिरीज” पुरस्कार सोनू अनवानी यांना देण्यात आला. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळाडूला “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार नर्मदा किड्स वेअर चे मोहित मानकानी यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज व सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार सुनील कुंदनानी यांनी दिला, तर बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट ट्रॉफी आकाश भावनानी यांनी प्रदान केली.या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मध्यप्रदेशहून आमंत्रित कॉमेडी अंपायर, ज्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि क्रिकेटप्रेमींमध्ये अधिक उत्साह निर्माण केला.
संपूर्ण समाजाने या स्पर्धेचा आनंद घेतला आणि जय हो ग्रुप परिवाराने भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे, अशी मागणी केली. या भव्य आयोजनाच्या यशस्वितेसाठी जय हो ग्रुप परिवाराच्या सर्व सदस्यांचे, समाजाच्या सहकार्याचे आणि खेळाडूंच्या जोशाचे व उत्साहाचे विशेष योगदान राहिले.जय हो ग्रुप परिवाराचा हा उपक्रम समाजात क्रीडाप्रेम वाढवण्यासाठी आणि आपसी बंधुत्व अधिक मजबूत करण्यासाठी एक स्तुत्य पाऊल आहे.