वयोवृध्द खेळाडू आणि कुस्तीगीरांना मानधनाची निश्चिती

0
14

मुंबई, दि.19 : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनिय कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडूंना मानधन ही योजना क्रीडा संचालनालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनिय कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडू आणि किताबप्राप्त कुस्तीगीरांना देण्यात येणाऱ्या मानधन रक्कमेची निश्चिती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर भाग घेतलेल्या खेडाळूंना 2500 रुपये इतक्या मानधनाची निश्चिती करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपिक/जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंसाठी 6,000 रुपये इतक्या  मानधनाची निश्चिती करण्यात आली आहे. तर आशियाई अजिंक्यपद/एशियन गेम्स/इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी 4,000 रुपये इतक्या
मानधनाची निश्चिती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू यांच्यासाठी अनुक्रमे 4,000 आणि 6,000 रुपये इतक्या मानधनाची निश्चिती करण्यात आली आहे. हिंद केसरी, रुस्तमे हिंद, भारत केसरी, महान भारत केसरी, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त कुस्तीगीर असलेल्या खेळाडूंसाठी 6,000 रुपये इतक्या मानधनाची निश्चिती करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत वयोवृध्द खेळाडूंना मानधनासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपये आहे. तसेच वयोवृध्द खेळाडूंनी त्यांचे हयातीचे आणि उत्पन्नाचे दाखले सादर करणे आवश्यक आहे. याबरोबरच अर्जदार पुरुष किंवा महिला खेळाडूंचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 50 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. हिंद केसरी, रुस्तमे हिंद, भारत केसरी, महान भारत केसरी, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त कुस्तीगीरांना वयाची अट लागू होणार नाही. दुर्धंर व्याधीने आजारी खेळाडू (अर्धांगवायू, क्षय, कर्करोग,कुष्ठरोग इत्यादी आणि शारीरीक व्यंग असल्यास) यांनी अपंगत्व अथवा दुर्धर
व्याधीसंबंधीचे शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र दिल्यास या खेळाडूंसाठी वयाची अट शिथील करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानधनासाठी खेळाडू हा ऑलिंपिक, आशियाई किंवा कॉमनवेल्थ यापैंकी किमान एका स्पर्धेत सहभागी झालेला असावा.
राज्यातील 127 वयोवृध्द खेळाडूंना मानधन योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये 56 लाख 46 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या योजनेबाबतची सविस्तर माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोवृध्द खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा
व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक सी.आर.कांबळे यांनी केले आहे.