गडचिरोली,दि.16: जिल्ह्यातील महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलिस अधिक्षक क्रीडांगण व जिल्हा क्रीडा संकुल, कलेक्टर कॉलनी याठिकाणी विविध क्रीडा प्रकार व सांस्कृतिक स्पर्धा पार पडणार आहेत. उद्घाटनपर कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग उपस्थित होते. यावेळी स्पर्धेची ज्योत आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा तहसीलदार अहेरी ओंकार तिवारी यांच्या हस्ते आणण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते क्रिडांगण वरील ज्योत पेटवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी शारीरिक स्वास्थ व मानसिक स्वास्थ्य यासाठी खेळ महत्वाचा असून, आपल्या आरोग्याचा विकास साधण्यासाठी खेळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मोहित गर्ग यांनी गडचिरोलीतील खेळाडू नेहमीच राज्य व देश पातळीवरती आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी सक्षम असतात. अशा खेळातून त्यांना नेहमीच आदर्श निर्माण होत गेला आहे असे प्रतिपादन केले. या स्पर्धेत 12 तालुक्यातून वेगवेगळ्या १२ महसूल खेळाडूंच्या टीम गडचिरोलीमध्ये दाखल झाले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची टीमही यामध्ये सहभागी झाली आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, संगीत कार्यक्रम, डान्स स्पर्धांचे आयोजन यावेळी दोन दिवसाच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आलेले आहे.





