37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ न.प.सभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फार्मुला 

न.प.सभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फार्मुला 

0
72
न्यायालयाच्या आदेशान्वये नवनिर्वाचित सभापती राहणार अकार्यशिल
गोंदिया,दि.15 : गोंदिया नगर परिषदेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली. त्याचाच परिणाम आज (दि.१५) नगर परिषदेच्या विषय समितीमध्ये पहावयास मिळाला. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने सभापती पदाच्या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करीत भाजपला सभापती पदापासून दूर ठेवले आहे. उल्लेखनिय असे की, महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यातून  पाच विषय समितीपैकी चार सभापती पदापासून भाजपला दूर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी न्यायालयाच्या आदेशान्वये नवनिर्वाचित सभापतींना पुढील आदेशापर्यंत अकार्यशिल रहावे लागणार आहे.
गोंदिया नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदासाठी आज (दि.१५) पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची सभा बोलाविण्यात आली होती. दरम्यान दुपारी १२ वाजता सुमारास सभेला सुरूवात झाली. सभेच्या सुरूवातीलाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेवर दिलेल्या आदेशाचे पत्र देण्यात आले. त्यानुरूप निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सर्वप्रथम सर्व विषय समितीच्या सदस्यांसाठी नियमानुरूप नावे स्विकारण्यात आली आहेत. यानंतर बांधकाम विषय समितीसाठी सतिश देशमुख (राकाँ) व विवेक मिश्रा (भाजप) या दोघांचे नामांकन आले. यात सतिश देशमुख हे ६ विरूध्द ५ मतांनी विजय ठरले. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक विषय समितीच्या सभापती पदासाठी निर्मला मिश्रा (काँग्रेस) व हेमलता पतेह (भाजप) यांचे नामांकन प्राप्त झाले. यात निर्मला मिश्रा ह्या ६ विरूध्द ५ मताने विजयी झाल्या. पाणी पुरवठा व जल निस्तारण समितीच्या सभापती पदासाठी भागवत मेश्राम (काँग्रेस) व अफसाना पठाण (भाजप) यांचे नामांकन प्राप्त झाले. यात भागवत मेश्राम हे ६ विरूध्द ५ मताने विजय झाले. महिला व बालकल्याण विषय समितीच्या सभापती पदासाठी ज्योत्सना मेश्राम (बसपा) व वर्षा खरोले (भाजप) या दोघांचे नामांकन आले. यात ज्योत्सना मेश्राम विजयी झाल्या. नियोजन समितीच्या सभापती पदासाठी बंटी पंचबुध्दे (भाजप) व संकल्प खोब्रागडे (बसपा) या दोघांचे नामांकन प्राप्त झाले. मात्र, संकल्प खोब्रागडे यांचे नामांकन अवैध ठरल्याने बंटी पंचबुध्दे यांची अविरोध निवड झाली.