मसाले उद्योगातून मीराने निवडला स्वावलंबनाचा मार्ग 

0
33
वाशिम दि.०२- पूर्वी चूल आणि मूल एवढ्यापुरतच महिलांचे विश्व होते. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन महिला आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविताना दिसत आहे. शासनाच्या योजनांचे जर महिलांना पाठबळ मिळाले तर त्या चांगल्या प्रकारे आपला उद्योग यशस्वी करुन स्वावलंबी तर होतातच सोबत इतर महिलांना देखील त्या रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात हे सिद्ध केले आहे वाशिम तालुक्यातील कळंबा (महाली) येथील मीरा दीपक कापसे ह्या गृहिणीने स्वराली मसाले उद्योगाच्या व्यवसायातून.
     टेलरिंग व्यवसायाची सुरुवात मीरा कापसे यांनी काही वर्षांपूर्वी गावात केली. या माध्यमातून तीन ते चार महिलांना टेलरिंग व्यवसायात रोजगार उपलब्ध करून दिला.त्यानंतर त्यांनी घरुनच रेडिमेड कपडे व साड्या विक्रीला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचे मन फारसे रमले नाही.पती दीपक कापसे यांची त्यांना साथ मिळाली. आपणच स्वावलंबी होऊन चालणार नाही तर आपल्यावर अवलंबून असलेल्या महिलांना तसेच इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी मीरा कापसे यांनी वाशिम येथील भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात आर-सेटीतून २० ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान निवासी स्वरूपाचे पाच दिवसाचे किमान कौशल्यावर आधारित उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले.
           कौशल्यावर आधारीत या प्रशिक्षणामुळे आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो हा आत्मविश्वास मीरा कापसे यांच्यामध्ये निर्माण झाला.प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेची माहिती त्यांना कृषी विभागाकडून मिळाली.२ वर्षापूर्वी मसाले तयार करण्याच्या कामाला घरीच सुरुवात केली.घरीच मेणबत्तीवर तयार केलेल्या मसाल्याच्या पुड्या पॅकिंग करण्याचे काम केले.घरीच तयार केलेली हळद पावडर, मिरची पावडर,मसाला,धने पावडर,लोणचे आणि पापड पॅकिंग करून आजूबाजूच्या गावात तसेच तालुक्याच्या ठिकाणी विक्री करण्यात येत होती परंतु त्यामधून फारसा नफा त्यामधून मिळत नव्हता.
       प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेची माहिती मीरा कापसे यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.आपण प्रशिक्षण घेतले असल्यामुळे आणि पूर्वी घरीच मसाले तयार करण्याचा उद्योग सुरू केल्यामुळे आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून मसाले तयार करण्याचा व आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून तो विकण्याचा निर्णय मीराबाईने घेतला. जानेवारी २०२२ मध्ये वाशिम येथील इंडियन बँकेकडे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत मसाला उद्योग सुरू करण्यासाठी १० लक्ष रुपये कर्ज मिळण्यासाठी प्रकरण बँकेकडे दाखल केले.मसाले उद्योग क्षेत्रातील पूर्वानुभव आणि याबाबत प्रशिक्षण घेतले असल्यामुळे इंडियन बँकेने जानेवारी २०२२ मध्ये कर्ज प्रकरण मंजूर केले. त्याच महिन्यात २ पॅकिंग मशीन आणि २ ग्रँडर मशीन साडेसात लाख रुपयातून खरेदी केल्या. उर्वरित पैशातून उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हळकुंड, मिरची, धने, पापडासाठी लागणारे उडीद व मुग विकत घेऊन त्यापासून सोल तयार केला. ” स्वराली ” या नावाचा मसाले ब्रँड विक्रीसाठी तयार केला.या योजनेतून ३५ टक्के अनुदान मिळाले.
        फेब्रुवारी २०२२ मध्ये ” स्वराली ” मसाले विक्रीला सुरुवात झाली.२५ ग्रॅम ते ५० ग्रॅम आणि १०० ग्रॅम ते एक किलो पॅकिंगमध्ये हळद,मिरची,धने पावडर, मसाला, २०० ग्रॅममध्ये पापड विक्रीसाठी उपलब्ध झाले.वाशिम हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे अनेक किराण दुकानदारांनी व ठोक विक्रेत्यांनी मसाल्याची, हळद, मिरची आणि धने पावडरची मागणी मोठ्या प्रमाणात नोंदविली.
       गावातील छाया खंडारे,अनिता राऊत,बेबी राउत,सोनी खंडारे,मंदा वैद्य,ज्योती जाधव,द्वारका महाले आणि नंदा महाले यांना ” स्वराली ” मसाले उद्योगातून रोजगार उपलब्ध झाला. फेब्रुवारी २०२२ मध्ये मसाला उद्योगाची नुकतीच सुरुवात झाली होती.केवळ २० हजार रुपयांच्या मालाची विक्री होऊन यामधून केवळ ५ हजार रुपये नफा मिळाला.सध्या महिन्याकाठी सर्व मालाची विक्री जवळपास दीड लाख रुपयांच्या वर होत आहे.यामधून मिळणारे निव्वळ उत्पन्न उत्पन्न ४० ते ४५ हजार रुपये आहे.मसाल्याला मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे.यावरून उद्योगात आम्ही यशस्वी ठरत असल्याचे मीरा कापसे यांनी सांगितले.ज्या महिलांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला त्यांना दर महिन्याला ३ ते ४ हजार रुपये मिळतात.भविष्यात हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्वरूपात सुरू करून गावातील जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे मीरा कापसे यांनी सांगितले.