सेलफोन दुरुस्तीतून आशिष बावणे यांचे एक पाऊल यशाकडे

0
12

आशिष प्रल्हाद बावणे हा मु. वडेगाव, पो. लोहारा, ता. देवरी, जि. गोंदिया येथील रहिवासी आहे. सदर युवक 12 वी उत्तीर्ण असून 27 वर्षाचा आहे. आशिष हा ग्रामीण भागातील एका गरीब शेतकरी मजुर कुटूंबातील युवक आहे. त्याला टेक्निकल क्षेत्रात समोर काहीतरी मोठे करायची इच्छा होती. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे त्याने पुढचे शिक्षण पुर्ण केले नाही. तो दुसऱ्यांकडे शेतीच्या कामाला सुध्दा जात होता आणि घरच्या शेतामध्ये वडिलांना सुध्दा हातभार लावत होता. परंतु शेतीच्या पार्श्वभूमीमुळे पिकांची लागवड करुन उत्पन्न मिळवण्याच्या पारंपरिक पध्दतीच्या पलिकडे जावून त्याने शेतीला काही जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार केला.

          आशिषला पुढे काहीतरी करायची इच्छा होती. परंतु कुठून सुरुवात करायला पाहिजे यातच तो गोंधळून गेला होता. एके दिवशी त्याने वर्तमानपत्रामध्ये आरसेटीची माहिती वाचली. त्यामध्ये सेलफोन रिपेयर्स ॲन्ड सर्विस 30 दिवसीय निवासी मोफत प्रशिक्षण मिळत आहे असे त्याला कळले. माहिती प्राप्त होताच लगेच वेळ न गमावता त्याने प्रशिक्षण संस्थेची माहिती घेतली आणि स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे उपलब्ध असलेल्या मोफत प्रशिक्षण संस्थेची माहिती घेऊन तो सर्व आवश्यक कागदपत्रांसह संस्थेत गेला आणि प्रशिक्षणासाठी अर्ज केला. संस्थेमध्ये सेलफोन रिपेयर्स ॲन्ड सर्विस प्रशिक्षण दरम्यान त्याला मिलीचे सादरीकरण, संवाद कौशल्य, बाजार सर्वेक्षण, उद्योजकीय सक्षमता इत्यादी सर्व माहिती मिळाली. मोबाईल रिपेयरिंगसह यशस्वी उद्योजक बनण्यासाठी कोणकोणते गुण आपल्या अंगी असायला पाहिजे हे सर्व कौशल्य आत्मसात केले आणि 30 दिवसाचे सेलफोन रिपेयर्स ॲन्ड सर्विस प्रशिक्षण पुर्ण केले.

        आशिषने 30 दिवसीय सेलफोन रिपेयर्स ॲन्ड सर्विसचे प्रशिक्षण मन लावून पुर्ण केले. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्याने लगेच आपले कौशल्य वाढविण्याकरीता मोबाईल रिपेयरिंगच्या दुकानामध्ये रोजंदारी मजुर म्हणून काम केले. त्यानंतर कर्जाची वाट न पाहता त्याने स्वत:च्या गावीच मोबाईल रिपेयरिंगची स्वत:ची दुकान उघडली. सुरुवातीला त्याने मोबाईल रिपेयरिंग दुरुस्ती व त्याचसोबत मोबाईल रिपेयरिंगचे लागणारे साहित्य विकू लागला. अशाप्रकारे आशिषने आपला व्यवसाय वाढविला आहे. त्याला आता मासिक उत्पन्न 15 ते 20 हजार रुपये प्रति महिना सरासरी होतो. प्रल्हाद बावणे यांचा मुलगा त्यांच्या कुटूंबासाठी पुरेसा पैसा कमावत असल्याने त्यांचे कुटूंबिय आता आनंदी आहेत व आशिषचे इलेक्ट्रिकल क्षेत्रात मोठे कार्य करण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करुन त्यांचे जीवन बदलण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आशिष व त्याचे कुटूंबियांनी स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, गोंदिया (आरसेटी) चे खुप खुप आभार मानले.