परळी- जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे परळी (Parli) शहरातील एका सामान्य कुटुंबातील आरती बोकरे (Aarti Bokre) हिने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आरतीने अन्न व औषध अधिकारी (Food and Drug Officer) होण्याचा मान मिळवला आहे.
2023 मध्ये दिलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, आरतीच्या या यशाने केवळ तिचे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण परळी शहराला आनंद झाला आहे.
कठोर परिश्रमाचे फळ :
आई-वडिलांना अभिमान वाटेल असे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आणि समाजासाठी योगदान देण्याची जिद्द उराशी बाळगून आरतीने 2023 मध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरी गेली होती. अनेक विद्यार्थी विविध क्लासेस आणि अनुभवी शिक्षकांची मदत घेऊनही अपयशी ठरतात, मात्र आरतीने फक्त मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिचे स्वप्न पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तिला अन्न आणि औषध विभागात अधिकारी पदाची जबाबदारी मिळाली असून, तिने परळी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.आरतीच्या या यशाबद्दल बोलताना तिचे कुटुंबीय अतिशय भावुक झाले होते. त्यांनी सांगितले की, आरती लहानपणापासूनच खूप हुशार आणि कष्टाळू होती.
आरतीच्या या यशाचा परळीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे. भीमनगरमधील अनेक विद्यार्थी आणि मुलींसाठी आरती एक प्रेरणास्थान बनली आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊनही तिने घेतलेली ही गरुडझेप अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत तिने स्वतःचे आणि समाजासाठी काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या वाटचालीत तिच्या कुटुंबाने तिला मोलाची साथ दिली. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू न देता ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.आरतीच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.